मुंबई | 22 ऑगस्ट 2023 : अभिनेते पंकज त्रिपाठी हे दमदार आणि सहज अभिनयकौशल्यासोबतच त्यांच्या विचारसरणीसाठीही ओळखले जातात. विविध मुलाखतीत त्यांनी मांडलेले विचार सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होतात. सध्या त्यांचा ‘ओह माय गॉड 2’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर उत्तम कामगिरी करतोय. सेन्सॉर बोर्डाकडून ‘A’ प्रमाणपत्र मिळूनही या चित्रपटाने कमाईचा 100 कोटींचा टप्पा पार केला आहे. यानिमित्त नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी बॉक्स ऑफिस कलेक्शनविषयी असलेल्या क्रेझबद्दल वक्तव्य केलं आहे. आपल्या वैयक्तिक आयुष्याशी काहीही संबंध नसतानाही समाजाच्या एका विशिष्ट वर्गाला चित्रपटांच्या कमाईबाबत किती वेड असतं याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केला.
एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत पंकज त्रिपाठी यांना चित्रपटाच्या कमाईबाबत काय वाटतं असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले, “यश हे नक्कीच फायद्याचं आहे पण अनेकांसाठी कला हा त्यांच्या हृदयाच्या खूप जवळचा विषय असतो. तर बॉक्स ऑफिस कलेक्शन हे चाहत्यांमध्ये आपापसांत चाललेलं युद्ध असतं. कमाईचा आकडा जाणून मलाही आनंद होतो. मला आकड्यांचं महत्त्वसुद्धा माहीत आहे. जेव्हा एखादा चित्रपट चांगली कमाई करतो, तेव्हा त्याचा फायदा निर्मात्यांना आणि संपूर्ण टीमला होतो. कलाकारांचाही भाव वधारतो. पण जेव्हा ट्विटरवर एखाद्या चित्रपटाच्या कमाईवरून तर्कवितर्क लावले जातात, तेव्हा मला आश्चर्य वाटतं. मला असा प्रश्न पडतो की, ही कोण लोकं आहेत, ज्यांना आपल्या आयुष्यापेक्षा जास्त चित्रपटांच्या कमाईची चिंता आहे?”
“कमाईच्या आकड्यांविषयी असलेलं वेड मला समजत नाही. खरंतर आकड्यांचा हा विषय त्याच्याशी संबंधित लोकांसाठी असायला हवा आणि त्यात निश्चितपणे चाहत्यांचा समावेश नसावा. त्यांनी बॉक्स ऑफिस कलेक्शनवर नाही तर कलेकडे लक्ष द्यावं,” असंही ते म्हणाले.
कमाईबाबत सतत चर्चा करणाऱ्या लोकांना पंकज त्रिपाठी पुढे म्हणाले, “भावा, तुम्ही लोकं करता तरी काय? आयुष्यात अजून काही विषय आहेत की नाही? आकड्यांबद्दल मी बोलणं ठीक आहे, कारण माझं आयुष्य त्याच्याशी निगडीत आहे. ज्यांना बॉक्स ऑफिस कलेक्शनची पर्वा असते, अशा प्रेक्षकांना मी सांगू इच्छितो की, बाबा तुम्ही माझ्या कलेनं चिंतीत व्हा माझ्या चित्रपटांच्या कमाईने नाही.”