बॉलिवूडचे प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेते पंकज त्रिपाठी यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पंकज त्रिपाठी यांच्या कुटुंबातील जवळच्या व्यक्तीचं निधन झालं आहे. पंकज त्रिपाठी यांच्या बहिणीच्या पतीचं रस्ते अपघातात निधन झाल्याची माहिती समोर येत आहे. पतीच्या निधनानंतर अभिनेत्याच्या बहिणीची प्रकृती गंभीर असल्याची देखील माहिती समोर येत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अपघात झारखंडच्या धनबादच्या निरसा येथे झाला. अपघातात पंकज त्रिपाठी यांच्या बहिणीच्या पतीचं निधन झालं असून, बहीण गंभीर जखमी आहे. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तिच्यावर उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पंकज त्रिपाठी यांच्या बहिणीला धनबाद येथील SNMMC रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती देखील गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. घटनेची माहिती नातेवाईकांना मिळताच त्यांनी रुग्णालयात धाव घेतली. अभिनेत्याची बहीण आणि तिचा नवरा स्विफ्ट कारमधून गोपालगंजहून कोलकाता येथे जात होते. हा अपघात निरसाजवळ घडला.
मेरे मित्र और अभिनेता भाई पंकज त्रिपाठी के बहनोई की भीषण सड़क हादसे में मौत की खबर सुनकर स्तब्ध हूं। ईश्वर से प्रार्थना है कि दिवंगत आत्मा को शांति प्रदान करे साथ ही शोकाकुल परिजनों को इस दुःख की घड़ी में हिम्मत दें।@TripathiiPankaj
— युवा बिहारी चिराग पासवान (@iChiragPaswan) April 20, 2024
लोक जनशक्ती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष चिराग पासवान यांनी घटनेची माहिती सोशल मीडियावर एक पोस्ट करत दिली आहे. शिवाय पंकज त्रिपाठी यांना टॅग करत त्यांनी दुःख व्यक्त केलं आहे. ‘माझे मित्र आणि अभिनेते पंकज त्रिपाठी यांच्या मेहुण्याचा भीषण रस्ता अपघातात मृत्यू झाल्याची बातमी ऐकून मला धक्का बसला. या दु:खाच्या प्रसंगी मृत आत्म्याला शांती देवो आणि शोकाकुल परिवाराला धीर देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना…’ चिराग पासवान यांची पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
पंकज त्रिपाठी यांच्या मेहुण्याचं नाव मुन्ना तिवारी असून त्यांच्या बहिणीचं नाव सबिता असं आहे. मुन्ना तिवारी कार चालवत होते आणि सबिता पतीच्या बाजूच्या सीटवर बसल्या होत्या. अपघाताचा फोटो देखील तुफान व्हायरल होत आहे. फोटो काळीज पिळवटून टाकणारा आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दोघेही NH 19 वर धनबादहून बंगालला जात होते, तिथे हा अपघात झाला. त्यांची कार सुमारे 3 फूट उंच डिव्हायडरला धडकली होती. कारची स्थिती पाहता ती भरधाव वेगाने जात असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. अपघात झाल्यानंतर मुन्ना तिवारी आणि सबिता यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण उपचारा दरम्यान मुन्ना तिवारी यांचं निधन झालं असून सबिता यांच्यावर उपचार सुरु आहेत.