मध्यप्रदेश: शाहरुख आणि दीपिका पदुकोण यांच्या ‘पठाण’ चित्रपटातील ‘बेशर्म रंग’ हे गाणं जेव्हापासून प्रदर्शित झालंय, तेव्हापासून नवा वाद निर्माण झाला आहे. या गाण्यातील दीपिकाच्या भगव्या बिकिनीवरून सामाजिक आणि राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत आहेत. मध्यप्रदेशचे नेते पठाण या चित्रपटाचा विरोध करताना दिसत आहेत. नरोत्तम मिश्रा यांच्यानंतर आता मध्यप्रदेश विधानसभाचे अध्यक्ष गिरीश गौतम यांनी पठाण चित्रपटाचा विरोध केला आहे. इतकंच नव्हे तर त्यांनी शाहरुखला आव्हानसुद्धा दिलं आहे.
पठाण चित्रपटावरून गिरीश गौतम हे शाहरुखला आव्हान देत म्हणाले, “शाहरुखने त्याच्या मुलीसोबत हा चित्रपट पाहून दाखवावा. मी नरोत्तम मिश्रा यांच्या वक्तव्याचं समर्थन करतो. नेहमी एकाच धर्माला का लक्ष्य केलं जातं? त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी पैगंबर यांच्यावर चित्रपट बनवावा. त्यात हिरव्या रंगाचे कपडे परिधान केलेली अभिनेत्री दाखवावी. त्यानंतर पहा जगभरात कसा वाद निर्माण होईल.”
“जेव्हा हिजाबचा प्रश्न विचारला गेला, तेव्हा हीच लोकं त्याचं उत्तर देणं टाळत होते. हा फक्त इराणचा मुद्दा आहे, असं म्हणून त्यांनी विषय टाळला. मी शाहरुख खानला म्हणतो, तुझी मुलगी 22-23 वर्षांची आहे, तिच्यासोबत बसून हा चित्रपट बघून दाखव. भगवा वस्त्र हे राष्ट्राच्या गौरवाचं चिन्ह आहे, हिंदू धर्माशी जोडलेला हा रंग आहे, तोच रंग बेशर्म का? हिरव्या रंगाचा सन्मान आणि भगव्याचा अपमान.. हे ठीक नाही,” असंही ते पुढे म्हणाली.
पठाण हा चित्रपट 25 जानेवारी 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे. यामध्ये शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणसोबत जॉन अब्राहमची मुख्य भूमिका आहे.