‘बिग बॉस’ हा टेलिव्हिजनवरील सर्वांत लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त रिॲलिटी शो आहे. या शोमध्ये अनेकदा सेलिब्रिटींच्या जोड्या बनतात आणि बिघडतात. अशीच एक लोकप्रिय जोडी म्हणजे अभिनेत्री पवित्रा पुनिया आणि एजाज खान यांची. ‘बिग बॉस 14’मध्ये हे दोघं सर्वाधिक चर्चेत होते. दोघांनीही स्पर्धक म्हणून शोमध्ये भाग घेतला आणि त्यानंतर त्यांच्यात चांगली मैत्री झाली. हळूहळू या मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं आणि दोघं बिग बॉस संपल्यानंतरही एकमेकांना डेट करू लागले होते. इतकंच नव्हे तर घरातून बाहेर पडल्यानंतर पवित्रा आणि एजाज लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले होते. मात्र रिलेशनशिपच्या दोन वर्षांतच त्यांचं ब्रेकअप झालं. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत पवित्राने तिच्या ब्रेकअपचं कारण सांगितलं आहे.
याविषयी पवित्रा म्हणाली, “एजाजला मी खूप आधीच सांगितलं होतं की मी माझा धर्म कधीच बदलणार नाही. जी व्यक्ती त्याच्या धर्माची नसते, ती कोणचाची नसते, असं मला वाटतं. दुसऱ्या व्यक्तीचा धर्म बदलण्याचा हक्क कोणालाच नाही. जो आपल्या धर्माशी प्रामाणिक नाही राहिला, तो तुमच्याशी कसा प्रामाणिक राहील? तुम्हाला लग्न करायचं असेल तर तरा, पण धर्म बदलण्यासाठी कोणाला काहीच म्हटलं नाही पाहिजे. मी माझ्या आयुष्यात खूप मोकळेपणे राहिली, पण एका गोष्टीची खंत मला नेहमीच राहील.”
आपल्या आयुष्याच्या खंतविषयी पवित्रा पुढे म्हणाली, “मी माझ्या रिलेशनशिपमध्ये असताना वडिलांच्या उपचाराकडे दुर्लक्ष केल्याची खंत मला नेहमी राहील. जेव्हा त्यांना सर्वांत जास्त माझी गरज होती तेव्हा मी त्यांच्याकडे जाऊ शकली नव्हती किंवा मला त्यांच्याजवळ जाऊ दिलं नाही कदाचित. असो, आता ब्रेकअप झाला आहे तर मी याबद्दल बोलणार नाही. परंतु मी माझ्या वडिलांसोबत राहायला पाहिजे होतं, जेव्हा त्यांना माझी सर्वाधिक गरज होती.”
पवित्रा आणि एजाज मुंबईतील मालाडमध्ये लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. ब्रेकअपनंतर एजाज त्या घरातून बाहेर पडला. त्यानंतर दोघांनीही बॉम्बे टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत ब्रेकअप जाहीर केला होता. ‘काहीच पर्मनंट नसतं’, असं पवित्रा या मुलाखतीत म्हणाली होती. “प्रत्येक नात्याचा एक काळ ठरलेला असतो. आमचं नातं फार काळ टिकलं नसलं तरी मी एजाजच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छाच देते. त्याचा मी आजही तितकाच आदर करते”, असं पवित्रा या मुलाखतीत म्हणाली होती. तर दुसरीकडे पवित्रालाही तिला अपेक्षित असलेलं प्रेम आणि यश मिळावं अशी आशा एजाजने व्यक्त केली होती.