मुंबई : 25 ऑक्टोबर 2023 | ‘पवित्र रिश्ता’ या लोकप्रिय मालिकेत भूमिका साकारलेला अभिनेता करणवीर मेहरा आणि त्याची पत्नी निधी सेठ हे लग्नाच्या दोन वर्षांतच विभक्त झाले आहेत. 2021 मध्ये करणवीरने गर्लफ्रेंड निधीशी लग्न केलं होतं. त्याचं हे दुसरं लग्न होतं. मात्र लग्नानंतर काही महिन्यांतच त्यांच्यात मतभेद निर्माण झाले. अखेर दोघांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला आहे. सध्या करण मुंबईत ‘बातें कुछ अनकहीं सी’ या मालिकेच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. तर दुसरीकडे निधी तिच्या कुटुंबीयांकडे बेंगळुरूला गेली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत निधी तिच्या घटस्फोटाविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. तीन महिन्यांपूर्वीच करणवीरपासून विभक्त झाल्याचं तिने स्पष्ट केलंय.
“आम्ही वर्षभरापूर्वीच वेगळे झालो होतो. माझ्या मते कोणत्याही नात्यात दररोज भांडणं होत असतील तर ते सहनशक्तीपलीकडे जातं. अशा परिस्थितीत कोणीच एकत्र राहू शकत नाही. मानसिक शांती, एकमेकांसाठी आदर, प्रामाणिकपणा आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम असणं.. या गोष्टी कोणत्याही वैवाहिक आयुष्यात गरजेच्या असतात. माझ्या मते कोणत्याही नात्यातील विषारीपणा सहन करता कामा नये”, अशा शब्दांत निधीने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
निधीने पुढे असंही सांगितलंय की, “कोणत्याही नात्यात कमिटमेंट देण्याआधी अनेक गोष्टींचा खोलवर विचार करणं गरजेचं असतं. दुर्दैवाने आजही लोकांना ही गोष्ट समजत नाही की ठराविक वागणं आणि मानवी स्वभाव यांमुळेही नातं खराब होऊ शकतं.” करणवीर मेहराचं निधीसोबतचं हे दुसरं लग्न होतं. याआधी त्याने 2009 मध्ये बालमैत्रीण देविकाशी लग्न केलं होतं. मात्र लग्नाच्या नऊ वर्षांनंतर 2018 मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला.
एप्रिल 2023 मध्ये करणवीर आणि निधी यांच्यात काहीच आलबेल नसल्याची चर्चा होती. कारण निधीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर करणवीरसोबतचे सर्व फोटो डिलिट केले होते. मात्र त्यावेळी दोघांनीही मौन बाळगणं पसंत केलं. करणवीर आणि निधीची पहिली भेट 2008 मध्ये एका जाहिरातीच्या शूटिंगदरम्यान झाली होती. त्यानंतर पुढील तीन वर्षांत दोघांनी काही प्रोजेक्ट्ससाठी एकत्र काम केलं. पहिल्या पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर करणवीर निधीला डेट करू लागला आणि दोघांनी 2021 मध्ये लग्न केलं.