नवी दिल्ली: भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीच्या समारोपाच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप नेत्यांना कठोर संदेश दिला. जे नेते माध्यमांसमोर काही वक्तव्य करतात आणि त्यावरून मोठा वाद निर्माण होतो, अशा नेत्यांना त्यांनी सूचना दिल्या आहेत. पंतप्रधान मोदींनी पक्षाच्या नेत्यांना अनावश्यक वक्तव्ये टाळण्यास सांगितलं आहे. “एकीकडे पक्षाचे मोठे नेते दिवसभर काम करत असतात आणि दुसरीकडे काही लोक चित्रपटांविषयी वक्तव्य करून वाद निर्माण करतात”, असं ते म्हणाले.
याविषयी मोदींनी म्हटलं, “आम्ही दिवसभर काम करतो आणि काही लोक एखाद्या चित्रपटाविषयी वक्तव्य करतात. त्यानंतर संपूर्ण दिवस टीव्ही आणि माध्यमांमध्ये तेच सुरू असतं. अशी अनावश्यक वक्तव्ये करणं टाळली पाहिजेत.”
अभिनेता शाहरुख खानचा ‘पठाण’ हा चित्रपट येत्या 25 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटावरून देशभरात मोठा वाद सुरू आहे. हा वाद सुरू असताना पंतप्रधान मोदींनी भाजप नेत्यांना दिलेला हा कठोर संदेश चर्चेचा विषय ठरला आहे. राम कदम आणि नरोत्तम मिश्रा यांच्यासह भाजपच्या काही नेत्यांनी चित्रपटातील काही सीन्सवर आक्षेप नोंदविला आहे आणि त्यावरून जोरदार टीकासुद्धा केली आहे. मुस्लीम समुदायाविषयी चुकीची वक्तव्ये करू नका, असंही मोदी यावेळी म्हणाले.
गेल्या महिन्यात जेव्हा ‘पठाण’ या चित्रपटातील ‘बेशर्म रंग’ हे गाणं प्रदर्शित झालं. तेव्हा त्यातील भगव्या रंगाच्या बिकिनीवरून मोठा वाद झाला. मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी या गाण्यातील काही दृश्यांवर आक्षेप घेतला होता. जर ती दृश्ये बदलली गेली नाहीत, तर मध्यप्रदेशमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, असा इशाराच त्यांनी दिला होता.
महाराष्ट्र भाजपचे नेते राम कदम यांनीसुद्धा ‘पठाण’च्या निर्मात्यांवर प्रश्न उपस्थित केले होते. स्वस्तात पब्लिसिटी मिळवण्यासाठी असं केलं की यामागे कोणता कट आहे, असा सवाल त्यांनी केला होता. “महाराष्ट्रात हिंदुत्वच्या आदर्शांवर चालणारी भाजपची सरकार आहे, त्यामुळे हिंदुत्वच्या भावनांचा अपमान करणारा कोणताही चित्रपट किंवा मालिका प्रदर्शित करण्याची परवानगी सरकार देणार नाही”, असं ते म्हणाले होते.