चेन्नई : दिग्दर्शक मणिरत्नम यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘पोन्नियिन सेल्वन’चा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘पोन्नियिन सेल्वन 2’चा ट्रेलर बुधवारी चेन्नईमधील नेहरू स्टेडियममध्ये लाँच करण्यात आला. यावेळी अभिनेते कमल हासन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. पहिल्या भागाप्रमाणेच या सीक्वेलच्या ट्रेलरमध्येही भव्यदिव्य सेट आणि थक्क करणारे सीन्स पहायला मिळतात. या मल्टिस्टारर चित्रपटाच्या सीक्वेलमध्ये अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन पुन्हा एकदा नंदिनीची दमदार भूमिका साकारताना दिसणार आहे.
या ट्रेलर लाँचचा ऐश्वर्या राय, कार्ती, विक्रम, जयम रवी आणि सोभिता धुलिपाला यांसह चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित होती. ए. आर. रेहमान यांनी या चित्रपटाला संगीत दिलं असून तेसुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होते. मंगळवारी ऐश्वर्याने या चित्रपटाचा नवीन पोस्टर प्रदर्शित केला. ‘त्यांच्या डोळ्यांमध्ये आग.. त्यांच्या हृदयात प्रेम.. त्यांच्या तलवारींवर रक्त.. सिंहासनासाठी लढण्यासाठी चोल पुन्हा येणार’, असं कॅप्शन तिने पोस्टरला दिलं होतं.
पोन्नियिन सेल्वन 1 मध्ये चोल सम्राट राजराजा 1 अरुलमोझिवर्मन (पोन्नियिन सेल्वन- (947-1014)) यांच्या सुरुवातीच्या जीवनाची कथा दाखवण्यात आली होती. या चित्रपटात जयम रवी हे अरुलमोझिवर्मनच्या भूमिकेत होते. तर विक्रम, कार्ती, त्रिशा आणि ऐश्वर्या यांनी इतर महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या.
पीएस- 1 या चित्रपटाने जगभरात 500 कोटी रुपयांहून अधिक गल्ला जमवला होता. तमिळनाडूमध्ये हा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला होता. कमल हासन यांच्या ‘विक्रम’ या चित्रपटाचा रेकॉर्ड पीएस-1 ने मोडला होता. या चित्रपटाच्या निमित्ताने ऐश्वर्या रायने जवळपास दशकभरानंतर तमिळ सिनेसृष्टीत पुनरागमन केलं. यामध्ये तिने नंदिनी आणि तिची मूक आई मंदाकिनी देवी अशा दुहेरी भूमिका साकारल्या होत्या. हिल्या भागातील तिच्या दमदार अभिनयाची प्रेक्षक-समिक्षकांकडून प्रशंसा झाली होती. पोन्नियिन सेल्वन 2 हा चित्रपट येत्या 28 एप्रिल रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
मणिरत्नम यांचा हा चित्रपट दोन भागांचा आहे. पोन्नियिन सेल्वनमधील पोन्नी म्हणजे कावेरी नदीचा पुत्र. या चित्रपटाची कथा कल्की कृष्णमूर्ती यांच्या कादंबरीवर आधारित आहे. यामध्ये चोल साम्राज्य आणि त्यांच्या उत्तराधिकाऱ्यांमध्ये होत असलेली लढाई दाखवण्यात आली आहे. दहाव्या शतकाच्या पार्श्वभूमीवर ही कथा आधारलेली आहे.