मुंबई : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता विक्रम सध्या मणिरत्नम दिग्दर्शित ‘पोन्नियिन सेल्वन 2’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. PS-2 नंतर विक्रमने त्याच्या आगामी ‘थंगलान’ या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली. मात्र या शूटिंगदरम्यान त्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्यामुळे पुढील काही दिवस तो कामातून ब्रेक घेणार आहे. विक्रमच्या मॅनेजरने याबद्दलची माहिती दिली. पोन्नियिन सेल्वन 2 नंतर त्याने लगेचच ‘थंगलान’च्या शूटिंगला सुरुवात केली होती. या चित्रपटातील एका सीनच्या शूटिंगदरम्यान विक्रमला जबर मार लागला आणि त्याची बरगडी तुटली.
विक्रमच्या मॅनेजरने ट्विटरवर त्याच्या दुखापतीविषयीची माहिती दिली. एका ॲक्शन सीन्सच्या शूटिंगदरम्यान त्याला दुखापत झाल्याचं मॅनेजरने सांगितलं. यामुळे चित्रपटाचं शूटिंगसुद्धा काही दिवसांकरिता थांबवण्यात आलं आहे. ‘शूटिंगदरम्यान विक्रमला मार लागला आणि त्याची बरगडी तुटली. त्यामुळे तो काही काळासाठी थंगलानची शूटिंग करू शकत नाही’, असं ट्विट मॅनेजरने केलं आहे. विक्रमची प्रकृती सध्या ठीक असून डॉक्टरांनी त्याला पूर्णपणे आराम करण्याचा सल्ला दिला आहे.
Thank you for all the love and appreciation Aditha Karikalan aka Chiyaan Vikram has received and for the astounding response to PS2 from all over the world. Chiyaan sustained an injury during rehearsals resulting in a broken rib due to which he will not be able to join his…
— Suryanarayanan M (@sooriaruna) May 3, 2023
‘थंगलान’ या चित्रपटाचं दिग्दर्शन पी. रंजीत करत आहेत. या चित्रपटाची कथा 19 व्या शतकाच्या सुरुवातीला खाण क्षेत्राच्या पार्श्वभूमीवर बेतलेली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा प्रेक्षकांना कोलार सोन्याच्या खाणीशी संबंधित कथा पहायला मिळणार आहे. या चित्रपटात चियान विक्रमशिवाय मालविका मोहनन आणि पार्वती यांच्याही मुख्य भूमिका आहेत. विक्रमने ‘पोन्नियिन सेल्वन 2’मध्ये चोल राजकुमार अदिता करिकलनची भूमिका साकारली आहे.
विक्रमने 1990 मध्ये अभिनय क्षेत्रातील करिअरची सुरुवात केली. मात्र 1999 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सेतू’ या चित्रपटामुळे त्याला खरी ओळख मिळाली. या चित्रपटातील भूमिकेसाठी विक्रमने 20 किलो वजन कमी होतं आणि टक्कल केलं होतं. सेतूनंतर त्याने जेमिनी, समुराई, धूल, कढल सदुगुडु, सामी, पितामगन, अरुल, अन्नियन, भीमा, रावणन, इरु मुगन आणि महान यांसारख्या चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत.
2003 मध्ये प्रदर्शित झालेल्या पितामगन या चित्रपटासाठी त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. तमिळमधील ‘अन्नियन’ आणि हिंदीतील ‘अपरिचित’ या चित्रपटातील या दुहेरी भूमिका आजही प्रेक्षकांच्या चांगल्याच लक्षात आहेत. यामध्ये त्याने रेमो आणि अंबी अशा दोन भूमिका साकारल्या होत्या. तर रावणन या तमिळ चित्रपटात त्याने ऐश्वर्या रायसोबत काम केलं होतं.