मुंबई : 17 फेब्रुवारी 2024 | गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात अभिनेत्री पूजा सावंतने एका खास व्यक्तीसोबतचे फोटो पोस्ट करत सर्वांना सुखद धक्का दिला होता. आता पूजाने त्याच खास व्यक्तीसोबत साखरपुडा केला आहे. पूजाच्या होणाऱ्या पतीचं नाव सिद्धेश चव्हाण असं आहे. ‘दगडी चाळ’, ‘चपाछपी’, ‘भेटली तू पुन्हा’ यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारलेल्या पूजाने अखेर तिच्या आयुष्याच्या एका टप्प्याची सुरुवात केली आहे. तिच्या साखरपुड्याचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंवर चाहते आणि मराठी कलाविश्वातील सेलिब्रिटींकडून शुभेच्छांचा वर्षाव होतोय.
साखरपुड्यासाठी पूजाने हिरव्या रंगाची साडी, नथ, दागिने असा सुंदर लूक केला होता. तर सिद्धेशने कुर्ता आणि धोती परिधान केली होती. यानंतर पूजा आणि सिद्धेशने पांढऱ्या रंगाच्या पोशाखाला पसंती दिली. यावेळी पूजाने पांढऱ्या रंगाचा लेहंगा तर सिद्धेशने त्याच रंगाची शेरवानी घातली होती. यावेळी दोघांनी त्यांच्या हातातील अंगठी दाखवली. पूजा आणि सिद्धेशचं हे अरेंज मॅरेज आहे. मात्र एकमेकांना पहिल्यांदा भेटल्यापासून ते लग्न ठरवण्यापर्यंत दोघांनी बराच वेळ घेतला. त्यामुळे हे अरेंज कम लव्ह मॅरेज असेल, असं तिने एका मुलाखतीत सांगितलं होतं.
सिद्धेशविषयी पूजा या मुलाखतीत म्हणाली होती, “आमचं तसं म्हणायला गेलं तर लव्ह मॅरेजच आहे. पहिल्यांदा भेटल्यापासून ते हाच माझा जोडीदार म्हणून ठरवण्यापर्यंतच्या प्रोसेसदरम्यान आम्ही अनेकदा एकमेकांना भेटत होतो. त्यावेळी एकमेकांचा स्वभाव नीट समजून घेतला. मला माझ्या खासगी आयुष्यातील काही गोष्टी सर्वांसमोर आणायला आवडत नाही. म्हणून गेली दीड वर्ष मी हे नातं सर्वांपासून लपवून ठेवलं होतं.”
सिद्धेशची निवड जोडीदार म्हणून का केली याविषयी सांगताना ती पुढे म्हणाली, “असा एक ठराविक क्षण सांगता येणार नाही. पण अनेक क्षण आहेत, ज्यामुळे मी सिद्धेशची निवड माझा जोडीदार म्हणून केली. खरंतर पहिल्या भेटीतच तो मला आवडला होता. स्थळ आल्यानंतर पहिल्यांदा मी त्याला फोन केला होता. नंतर जसजसं भेटत आणि बोलत गेलो, तसतसा मला त्याचा स्वभाव कळला.”