मुंबई : 2 फेब्रुवारी 2024 | प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेत्री पूनम पांडेचं गुरुवारी रात्री निधन झालं. सर्वाइकल कॅन्सरने तिचं निधन झाल्याची माहिती तिच्या टीमने दिली. पूनमच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिच्या निधनाविषयीची पोस्ट लिहिण्यात आली आहे. पूनमने 2013 मध्ये ‘नशा’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यापूर्वी ती मॉडेलिंगमध्ये करिअर करत होती. सोशल मीडिया अकाऊंट्सवरील सेमीन्यूड फोटो आणि व्हिडीओमुळे ती सतत चर्चेत असायची. वयाच्या 32 व्या वर्षी पूनमने अखेरचा श्वास घेतला. तिच्या नावे कोट्यवधी रुपयांची संपत्ती आहे.
पूनमची एकूण संपत्ती जवळपास 7 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 52 कोटी रुपये इतकी आहे. मुंबईतील वांद्रे परिसरात तिचा आलिशान अपार्टमेंट आहे. या अपार्टमेंटची किंमत कोट्यवधी रुपये आहे. याशिवाय तिच्याकडे लग्झरी कारसुद्धा आहेत. तिच्याकडे असलेल्या BMW 5 सीरिजमधील सेडान कारची किंमत जवळपास 55 लाख रुपये आहे. अभिनय आणि मॉडेलिंगशिवाय तिने बऱ्याच जाहिरातींमध्येही काम केलंय. मिळालेल्या माहितीनुसार, ती एका चित्रपटासाठी जवळपास एक कोटी रुपये मानधन स्वीकारत होती.
पूनमचं खासगी आयुष्य सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत होतं. 1 सप्टेंबर 2020 रोजी तिने बॉयफ्रेंड सॅम बॉम्बेशी लग्न केलं होतं. मात्र लग्नाच्या अवघ्या काही दिवसांतच तिने पतीविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती. सॅमवर तिने धमकी आणि मारहाणीचा आरोप केला होता. त्यानंतर 23 सप्टेंबर रोजी सॅमला गोव्यातून अटक झाली होती.
पूनमला अनेकदा सार्वजनिक ठिकाणी बोल्ड कपड्यांमध्ये पाहिलं गेलंय. ट्रोलिंगला न जुमानता पूनम अनेकदा बोल्ड अंदाजात दिसायची. कंगना रनौतच्या ‘लॉक अप’ या शोमध्ये ती म्हणाली होती, “माझ्या पहिल्या नशा या चित्रपटानंतर मला ज्या काही ऑफर्स येत होत्या ते मी घेऊ नये असं अनेक लोक सांगू लागले होते. मला अभिनय करायचं आहे, चित्रपटांमध्ये काम करायचं आहे असं मी त्यांना सांगू इच्छिते. मी उत्तम डान्सर आहे आणि अभिनेत्रीसुद्धा आहे, हे मला सिद्ध करून दाखवायचं आहे. चुकीचे निर्णय घेऊन माझी दिशाभूल झाली. पण आता मी योग्य मार्ग निवडणार आहे.”