मुंबई | 7 ऑगस्ट 2023 : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते अनु कपूर यांना कोण ओळखत नाही! त्यांनी आतापर्यंतच्या कारकिर्दीत एकापेक्षा एक दमदार भूमिका साकारल्या आहेत. अभिनयासोबत ते बेधडकपणे आपली मतं मांडण्यासाठीही ओळखले जातात. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ते विविध मुद्द्यांवर मोकळेपणे व्यक्त झाले. इंडस्ट्रीत संघर्ष करणाऱ्या कलाकारांवर त्यांनी वक्तव्य केलं. मात्र यावेळी त्यांनी दिलेल्या एका उदाहरणामुळे नेटकरी अवाक् झाले आहेत. “या जगात प्रत्येकजण संघर्ष करतोय. इतकंच काय तर उद्योगपती मुकेश अंबानीसुद्धा स्ट्रगल करत आहेत”, असं ते म्हणाले.
‘टाइम्स नाऊ’ला दिलेल्या या मुलाखतीत ते म्हणाले, “मला या जगात अशी एक व्यक्ती सांगा, जी संघर्ष करत नाही. या पृथ्वीवर प्रत्येकजण स्ट्रगल करतोय. तुम्हाला संघर्ष हा फक्त पैशांचा किंवा यशाचा वाटतो, पण असं नाहीये. जर तुम्ही मुकेश अंबानी यांनासुद्धा विचारलंत तर त्यांचासुद्धा संघर्ष आहे, ते सुद्धा स्ट्रगलर आहेत.” आपलं म्हणणं मांडताना ते पुढे म्हणाले, “मुकेश अंबानी यांच्याकडे पैसा आहे आणि वर्तमानकाळात कोणत्याच गोष्टीची कमतरता नाही. मात्र त्यांनासुद्धा ही गोष्ट माहीत आहे की संपत्ती किंवा प्रसिद्धी फार काळ टिकत नाही. त्यामुळे त्यांना दररोज संघर्ष करावा लागतोय.”
याआधी अनु कपूर यांनी दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या आगामी ‘रामायण’ या प्रोजेक्टबद्दल प्रतिक्रिया दिली होती. ते म्हणाले होते, “कोण आहेत नितेश तिवारी? त्यांनी लायकी काय आहे? हिंदू धर्माचा अपमान करु इच्छित आहेत? त्यांना चपलांचा मार खावा लागेल. कोणत्याच धर्माचा अपमान करणं योग्य नाही. आधी स्वत: नीट धर्माला समजून घेतलं पाहिजे आणि त्यानंतर त्याबद्दल बोललं पाहिजे.”
अनु कपूर हे लवकरच आयुषमान खुरानाच्या ‘ड्रीम गर्ल 2’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. याशिवाय ते राजपाल यादव आणि मनोज जोशी यांच्यासोबत ‘नॉन स्टॉप धमाल’ या चित्रपटातही भूमिका साकारणार आहेत.
अनु कपूर यांचं बालपण फार गरीबीत गेलं. सुरुवातीला त्यांना अभिनेता नव्हे तर IAS अधिकारी बनायचं होतं. मात्र आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना स्वप्न पूर्ण करता आलं नाही. संघर्षाच्या काळात त्यांनी चहाची टपरी चालवून घराचा गाडा चालवला. याशिवाय त्यांनी लॉटरीची तिकिटं विकण्याचंही काम केलं.