मुंबई : एकेकाळी मुंबईतील लालबाग इथल्या हनुमान थिएटरमध्ये लावणीसम्राज्ञी शांताबाई लोंढे यांच्यासाठी टाळ्यांचा कडकडाट व्हायचा. चार दशकांपूर्वी शांताबाई यांनी आपल्या लावणी नृत्याने आणि अदाकारीने रसिकांच्या मनावर राज्य केलं होतं. मात्र आज त्याच शांताबाई उदरनिर्वाहासाठी रस्त्यावर भीक मागताना दिसत आहेत. सोशल मीडियावर त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये त्या ‘बुगडी माझी सांडली गं’ हे गाणं रस्त्यावर गाताना दिसत आहेत. मात्र आज त्यांची अवस्था पाहून अनेकांचं हृदय पिळवटून निघालं आहे.
शांताबाई लोंढे यांची लोकप्रियता तेव्हा शिगेला पोहोचली जेव्हा कोपरगावकर बस स्थानकाचे कर्मचारी अत्तर भाई यांनी त्यांच्यासोबत शांताबाई कोपरगावकर नावाचं नाटक सुरू केलं होतं. त्याकाळी हे नाटक तुफान गाजलं आणि शांताबाईंना खूप प्रसिद्धी मिळाली. शांताबाई या लावणी नृत्यावर आधारित थिएटर ग्रुपच्या मालक बनल्या आणि नंतर त्यांच्या हाताखाली त्यांनी जवळपास 60 जणांना काम दिलं. मात्र शांताबाई यांच्या निरक्षरतेचा फायदा घेत अत्तर भाईने मालमत्तेच्या बाबतीत फसवणूक केली. आता 75 वर्षीय शांताबाई या कोपरगावकर बसस्थानकाच्या आवारात निराधार जीवन जगत आहे. त्यांना राहण्यासाठी घर नाही. गेल्या काही वर्षांपासून त्या अन्नासाठी भीक मागत परिसरात फिरत आहेत.
एकाने शांताबाई यांच्या गाण्याचा व्हिडीओ शूट करून तो सोशल मीडियावर पोस्ट केला. खानदेश परिसरातील काही तमाशा कलावंतांनी हा व्हिडीओ पाहून कोपरगाव तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते अरुण खरात यांना पाठवला. खरात यांनी दोन दिवस शांताबाईंचा शोध घेतला आणि अखेर कोपरगाव बस स्थानकाजवळ त्यांना शांताबाई सापडल्या. अरुण खरात आणि त्यांचे मित्र डॉ. अशोक गावितरे यांनी त्यांना रुग्णालयात नेलं आणि त्यांची वैद्यकीय मदत केली. त्याचसोबत खरात यांनी महाराष्ट्र सरकारला शांताबाई यांच्या मदतीसाठी विनंती केली.
अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीदेखील शांताबाईंची दखल घेतली. त्यांना योग्य ती मदत करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. शांताबाई यांचं पुनर्वसन करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं आहे. त्याचसोबत त्यांची कायमस्वरुपी व्यवस्था होईपर्यंत माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी शिर्डीतील द्वारकामाई वृद्धाश्रमात त्यांची व्यवस्था केली आहे.