अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajaktta Mali) सध्या तिच्या ‘रानबाजार’ (RaanBaazar) या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. या सीरिजमध्ये प्राजक्ताने साकारलेल्या बोल्ड भूमिकेविषयी सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली. काहींनी तिला ट्रोल केलं, तर काहींनी तिच्या अभिनयाचं कौतुक केलं. मराठी चित्रपट आणि सीरिजनंतर प्राजक्ताने आपला मोर्चा बॉलिवूडकडे वळविला आहे. बॉलिवूड (Bollywood) चित्रपटांसाठी ती सध्या ऑडिशन देत असून नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ती याविषयी व्यक्त झाली. “लोकांनी केवळ मला माझ्या सौंदर्यामुळे नाही तर अभिनयामुळे लक्षात ठेवावं अशी माझी इच्छा आहे”, असं प्राजक्ता यावेळी म्हणाली. बॉलिवूडच नाही तर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत काम करण्याचीही इच्छाही तिने या मुलाखतीत बोलून दाखवली.
“माझ्या बोल्ड भूमिकेबाबत सोशल मीडियावर किंवा ऑनलाइन न्यूज पोर्टलवर जे काही बोललं जातं त्याने मला फारसा फरक पडत नाही. ओटीटी प्लॅटफॉर्मची ही स्ट्रॅटेजी होती आणि ती बरोबर कामी आली. माझ्या मते, इंटिमेट सीन्सपेक्षा या सीरिजचा कंटेट अधिक बोल्ड आहे”, असं ती म्हणाली.
“माझ्या अभिनयापेक्षा माझ्या लूक्सविषयी अधिक बोललं जातं. मात्र रानबाजार या सीरिजमध्ये कदाचित हे चित्र बदलू शकेल. मी फक्त सुंदर नसून उत्तम अभिनेत्रीसुद्धा आहे, या दृष्टीने लोकांनी माझ्याकडे पहावं अशी माझी इच्छा आहे. त्यामुळे भविष्यातही मला अशा आव्हानात्मक भूमिका मिळाव्यात. या सीरिजमुळे त्यांना माझी क्षमता कळाली असेल. पण तरीसुद्धा हे माझं बेस्ट काम नाही. माझं सर्वोत्कृष्ट काम मला अजून प्रेक्षकांसमोर आणायचं आहे”, अशा शब्दांत प्राजक्ता व्यक्त झाली.
प्राजक्ता सध्या बॉलिवूड चित्रपटांसाठीही ऑडिशन्स देत आहे. याविषयी ती पुढे म्हणाली, “मला चांगल्या भूमिका हव्या आहेत. मी सहाय्यक भूमिका करू शकत नाही. लोकांनी माझ्यातील कलेला ओळखावं अशी माझी खूप इच्छा आहे. जेव्हा तुम्ही बॉलिवूड चित्रपटात काम करता, तेव्हा देशभरातील प्रेक्षकांना तुमची ओळख होते. त्यामुळे मी माझ्या कक्षा रुंदावण्याचा प्रयत्न करतेय. फक्त बॉलिवूडच नाही तर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही मुख्य अभिनेत्री म्हणून मला काम करायचं आहे. हल्ली हिंदी सिनेमे आणि सीरिजमध्येही आपल्याला अधिकाधिक मराठी चेहरे पहायला मिळत आहेत.”