निर्माते-दिग्दर्शक प्रकाश झा (Prakash Jha) हे गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड चित्रपटांचे विषय आणि सेलिब्रिटींवर बेधडकपणे वक्तव्य करत आहेत. आता पुन्हा एकदा त्यांनी बॉलिवूडमधील मोठ्या सेलिब्रिटींवर निशाणा साधला आहे. आपल्या चित्रपटांसाठी मोठा स्टार मिळत नसल्याची तक्रार त्यांनी यावेळी केली. “तंबाखू (tobacco) विकून झाल्यानंतर जेव्हा यांना कथेवर लक्ष केंद्रीत करायचं असतं, तेव्हा ते माझ्याकडे येतात”, असा टोलाच त्यांनी लगावला.
‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत प्रकाश झा म्हणाले, “इथे फक्त 5-6 अभिनेते आहेत. त्या अभिनेत्यांची हालत काय आहे ते पहा. जर त्यांना गुटखाच्या जाहिरातीसाठी 50 कोटी मिळत असतील तर ते चित्रपटांमध्ये का काम करतील? हे अभिनेते गुटखा विकत आहेत. तुम्ही कल्पना तरी करू शकता का? बॉलिवूडमधील हे दिग्गज कलाकार काय काम करत आहेत?”
“आम्ही एका शाळेत शूटिंगनिमित्त गेलो होतो. त्या शाळेचे मुख्याध्यापक मला विचारत होते की तुम्ही मुंबई फिल्म इंडस्ट्रीमध्ये काय करत आहात? आमच्या शाळेतील मुलांना गुटखा खाताना पकडलं गेलंय. लखनऊ, प्रयागराज आणि मुगलसराई या भागांमध्ये मोठमोठ्या कलाकारांच्या गुटखा आणि पान मसाला विकण्याच्या जाहिराती होर्डिंगवर लावले आहेत”, असा अनुभव त्यांनी सांगितला.
“चित्रपट फक्त पैशांनी बनवता येत नाही. त्याची सुरुवात एका विषयाने होते. चित्रपट बनवण्याच्या आवडीने त्याची खरी सुरुवात होते. ते फक्त तुम्हाला मिळालेल्या 500 कोटींच्या गुंतवणुकीने होत नाही. पण सध्या हेच होताना दिसतंय. मी एकही दिवस शांतपणे बसलेलो नाही. मी सतत वेगवेगळ्या विषयांवर काम करत आहे. गेले कित्येक महिने मी कोणत्या मोठ्या स्टारसोबत काम केलं नाही. पण ठीक आहे. मी माझ्या कामाबाबत खूश आहे. जेव्हा त्यांना गुटखा विकण्यापासून वेळ मिळेल, तेव्हा ते माझ्याकडे आपोआप येतील”, असंही त्यांनी म्हणून दाखवलं.
प्रकाश झा यांनी परिणती, मृत्यूदंड, दिल क्या करे, गंगाजल, अपहरण, राजनिती, आरक्षण, परीक्षा आणि सांड की आँख यांसारख्या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. त्यांनी आश्रम ही प्रसिद्ध वेब सीरिजसुद्धा दिग्दर्शित केली. ज्यामध्ये बॉबी देओल, अदिती पोहणकर, दर्शन कुमार, चंदन रॉय सन्याल, तुषार पांडे, अनुप्रिया गोयंका, अध्ययन सुमन आणि विक्रम कोच्चर यांच्या भूमिका होत्या.