मुंबई | 10 ऑक्टोबर 2023 : दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा ‘द वॅक्सिन वॉर’ हा चित्रपट 30 सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. मात्र या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर विशेष कामगिरी केली नाही. या चित्रपटात कोविड महामारीच्या काळातील संघर्ष दाखवण्यात आला आहे. त्याचसोबत कोविड-19 प्रतिबंधक लस बनवण्यासाठी डॉक्टर्स आणि शास्त्रज्ञ यांचे प्रयत्न दाखवण्यात आले आहेत. यादरम्यान सोशल मीडियावर एक क्लिप व्हायरल झाला. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारतीय शास्त्रज्ञांशी बोलताना दिसत आहेत. “फक्त विज्ञानानेच कोरोनाला हरवलं जाऊ शकतं”, असं ते म्हणतात. हा व्हिडीओ शेअर करत आता ‘सिंघम’ फेम अभिनेते प्रकाश राज यांनी मोदींवर निशाणा साधला आहे.
आयटी सेलचे प्रमुख अमित मालविय यांनी चित्रपटातील एक क्लिप शेअर करत ट्विटरवर लिहिलं होतं की, ‘फक्त विज्ञानाच्या जोरावरच ही लढाई जिंकली जाऊ शकते, असं पंतप्रधान म्हणाले.’ या व्हिडीओमध्ये नाना पाटेकर आणि पल्लवी जोशी हे चित्रपटात भारतीय शास्त्रज्ञांच्या भूमिकेत आहेत. एकमेकांसोबत चर्चा करताना ते म्हणतात की, “पंतप्रधान मोदींनी म्हटलंय की हे युद्ध आपण फक्त विज्ञानाच्या जोरावरच जिंकू शकतो. तुमच्याकडे बरेच लोक बऱ्याचशा गोष्टी घेऊन येतील, मात्र तुमचे सर्व निर्णय हे फक्त विज्ञानावर आधारित असले पाहिजेत.” अमित मालविय यांच्या ट्विटवर प्रकाश राज यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
That’s in the film Saar …. But in reality ….WHO asked us to … Ghanta bajao…thali bajao…
and Sing …”Go Corona Go “ #justasking https://t.co/FR3lWxEf2S— Prakash Raj (@prakashraaj) October 7, 2023
‘हे फक्त चित्रपटात दाखवण्यापुरती आहे सर. पण खऱ्या आयुष्यात आम्हाला कोणी घंटा आणि थाळ्या वाजवण्यास सांगितलं होतं? गो कोरोना गो हे गाणं कोणी गायला लावलं?’, असं प्रकाश राज यांनी लिहिलं. त्यांचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होत आहे. या ट्विटवरून काहींनी त्यांना ट्रोलसुद्धा केलं आहे. ‘ज्या देशाच्या थाळीत खातात, त्यातच छेद करतात’, असं एकाने म्हटलंय. तर ‘हे खऱ्या आयुष्यातसुद्धा खलनायकच आहेत’, असं दुसऱ्या युजरने लिहिलं. ‘द वॅक्सिन वॉर’ या चित्रपटात नाना पाटेकर, पल्लवी जोशी, अनुपम खेर, रायमा सेन यांच्या भूमिका आहेत.