अभिनेत्री प्रार्थना बेहरेनं विविध मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या मनावर विशेष छाप सोडली. सोशल मीडियावर प्रार्थनाचा मोठा चाहतावर्ग आहे. सध्या ती कोणत्या मालिका किंवा चित्रपटात काम करत नसली तरी इन्स्टाग्रामवर विविध फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत ती चाहत्यांच्या संपर्कात असते. प्रार्थनाने अनेकदा फोटो आणि व्हिडीओंमार्फत तिचं मुंबईतील जुहू इथल्या घराची झलक दाखवली आहे. जुहू याठिकाणी समुद्रकिनारी प्रार्थनाचं घर आहे. मात्र हे आलिशान घर सोडून प्रार्थना आणि तिचे कुटुंबीय दुसऱ्या ठिकाणी स्थायिक झाली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने यामागचं कारण सांगितलं.
सुलेखा तळवलकर यांच्या ‘दिल के करीब’ या खास मुलाखतीत प्रार्थनाने मुंबई सोडण्यामागचं कारण सांगितलं आहे. “अभिच्या (अभिषेक) आजोबांची अलिबागमध्ये जागा आहे. कोरोना काळात आम्ही त्या जागेचा विकास करण्याचा निर्णय घेतला होता. नंतर जेव्हा रो-रो बोट सुरू झाली, तेव्हा मुंबई ते अलिबागचा प्रवाससुद्धा सोपा झाला आणि आमचा खूप वेळ वाचायचा. तिथे आम्ही घोडे, गायी, कुत्रे पाळले आहेत. त्या सगळ्यांच्या देखरेखीसाठी अभिला सतत अलिबागला ये-जा करायला लागायचं. अखेर आम्ही ठरवलं की आपण सगळेच तिथे राहायला जाऊयात”, असं ती म्हणाली.
मुंबईत आता पहिल्यासारखी मज्जा राहिली नाही, असंही प्रार्थना म्हणाली. “मालिका सुरू असताना आम्ही जुहूला राहायचो. पण सतत गर्दी, वाहतूक कोंडी यांमुळे मुंबईचा वैताग येऊ लागला. स्वत:साठी काहीच वेळ देता येत नव्हतं. अलिबागमध्ये थोडं निवांत राहता येईल असं वाटलं. इथे मला माझी पेंटिंगचीही आवड जपता येते. मी सगळीकडे बिनधास्त मेकअपशिवाय फिरते. निसर्गाच्या सानिध्यात बराच वेळ घालवते. या सगळ्याच माझ्या आवडत्या गोष्टी आहेत. म्हणूनच आम्ही अलिबागला कायमस्वरुपी राहायला यायचं असं ठरवलं. माझ्या सासू-सासऱ्यांनीही या निर्णयाला पाठिंबा दिला. इथल्या वातावरणात त्यांचं आयुष्य आणखी वाढलंय असं मला वाटतं. प्रवासाच्या दृष्टीने आम्हाला थोडा त्रास होईल, पण आता त्याचीही सवय झाली आहे”, असं तिने सांगितलं.