विधानसभा निवडणुकीत दमदार कामगिरी करत महायुतीने जोरदार मुसंडी मारली आहे. 288 पैकी तब्बल 235 जागा जिंकून महायुतीने महाविकास आघाडीला अस्मान दाखवलंय. एकट्या भाजपला तब्बल 132 जागांवर विजय मिळाला. शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट या पक्षांनीही जोरदार मुसंडी मारत उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या पक्षांना हादरा दिला. निवडणुकीच्या तोंडावर आणलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’, प्रचार रंगात आला असताना भाजपने चर्चेत आणलेलं ‘बटेंगे तो कटेंगे’, ‘एक है तो सेफ है’ हे मुद्दे याचा महायुतीला मोठा फायदा झाला. या निकालाबाबत सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया समोर येऊ लागल्या आहेत. सर्वसामान्यांपासून अनेक सेलिब्रिटींनीही या निकालावर आपलं मत नोंदवलं आहे. यात मराठी कलाकारांचाही समावेश आहे.
‘जो हिंदू हित की बात करेगा, वही देश पर राज करेगा. धर्मो रक्षति रक्षित: हिंदूऐक्य चिरायू होवो’, अशी पोस्ट अभिनेता प्रसाद ओकने लिहिली आहे. तर उत्कर्ष शिंदेनं बारामतीचा निकाल लागल्यानंतर अजित पवारांचं अभिनंदन केलं. काका विरुद्ध पुतण्याच्या लढाईत अजित दादांनी मोठ्या फरकाने बाजी मारली. नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघात देवेंद्र फडणवीस विजयी झाल्यानंतर अभिजीत केळकरने पोस्ट लिहित त्यांचं अभिनंदन केलं. तर बिग बॉस मराठीची विजेती मेघा धाडेनंही फडणवीसांचं जुनं भाषण इन्स्टा स्टोरीमध्ये शेअर करत शुभेच्छांचा वर्षाव केला.
लोकसभा निवडणुकीतील यशानंतर गाफील राहिलेल्या महाविकास आघाडीला पक्षफुटी, संविधान आदी न चालणाऱ्या मुद्द्यांना महत्त्व दिल्याचाही फटका बसला. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, यांच्यासह बाळासाहेब थोरात, यशोमती ठाकूर, धीरज देशमुख, माणिकराव ठाकरे या दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला. खुद्द काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना निसटता विजय मिळाला. राज ठाकरे यांचा मनसे आणि प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीला भोपळाही फोडता आला नाही.
महायुतीच्या या घवघवीत यशानंतर आता राज्याचा नवा मुख्यमंत्री कोण होणार, याची उत्कंठा आहे. बहुमताच्या अगदी जवळ पोहोचल्यामुळे आपलाच मुख्यमंत्री असावा अशी भाजपच्या नेत्यांची भूमिका असली तरी महायुतीचे नेते तसंच भाजपचे केंद्रीय नेते एकत्र येऊन मुख्यमंत्रीपदाचा निर्णय घेतील, असं सांगण्यात येत आहे. मुख्यमंत्रीपदाबरोबरच घटक पक्षांना किती आणि कोणती खाती मिळणार, याची चर्चाही सुरू झाली आहे.