रणदीप हुडा अभिनीत आणि दिग्दर्शित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटाने अनेकांचं लक्ष वेधलं आहे. पुरेशा वितरणाअभावी बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाची जोरदार कमाई होत नसली तरी प्रेक्षक-समिक्षकांकडून या चित्रपटाचं आणि त्यातील कलाकारांच्या अभिनयाचं कौतुक होत आहे. प्रेक्षकांसोबतच विविध सेलिब्रिटीसुद्धा या चित्रपटाविषयी सोशल मीडियावर बोलू लागले आहेत. आतापर्यंत दिग्दर्शक प्रवीण तरडे, अभिनेता सौरभ गोखले, सुप्रिया पिळगावकर यांनी या चित्रपटाविषयी खास पोस्ट लिहिली होती. त्यात आता अभिनेता प्रसाद ओकचाही समावेश झाला आहे. प्रसादने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटाविषयी लिहिलेली पोस्ट चर्चेत आली आहे. या पोस्टमध्ये त्याने चाहत्यांना कोणत्याही खोट्या पोस्टकडे लक्ष देऊ नका, असं आवाहन केलं आहे.
”स्वातंत्र्यवीर सावरकर’.. अप्रतिम चित्रपट! अत्यंत अभ्यासपूर्ण आणि विचारपूर्वक केलेली मांडणी. अतिशय संयत अभिनय. उत्तम पटकथा. देखणं छायाचित्रण. परिणामकारी पार्श्वसंगीत. रणदीप हुडा, अंकिता लोखंडे आणि संपूर्ण टीमचं मनःपूर्वक अभिनंदन. चित्रपट आता मराठीतसुद्धा प्रदर्शित झाला आहे. आमचे मित्र सुबोध भावे यांनी सावरकरांना आवाज दिलेला आहे. कोणत्याही खोट्या पोस्ट्सकडे लक्ष देऊ नका. चित्रपट उत्तम प्रतिसादात चालू आहे. या निमित्ताने पुन्हा एकदा सावरकरांना त्रिवार वंदन,’ अशी पोस्ट प्रसादने लिहिली आहे. त्याच्या या पोस्टवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत.
‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर धीम्या गतीने कमाई सुरू आहे. 22 मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने नवव्या दिवशी भारतात 1.50 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर दोन मोठ्या चित्रपटांसोबत टक्कर झाली आहे. तब्बू, करीना कपूर आणि क्रिती सनॉन यांचा ‘क्रू’ आणि ‘गॉडझिला व्हर्सेस काँग : द न्यू एम्पायर’ या दोन चित्रपटांशी टक्कर असतानाही रणदीपच्या ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाने आतापर्यंत 13.95 कोटी रुपये कमावले आहेत.
‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटात रणदीप हुडा, अंकिता लोखंडेसोबत अमिय सियाल आणि राजेश खेरा यांच्याही भूमिका आहेत. हा चित्रपट मराठी आणि हिंदी अशा दोन भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. मराठी भाषेत रणदीपच्या भूमिकेला अभिनेता सुबोध भावेने आवाज दिला आहे.