रिक्षाचालकांच्या मुजोरीपणाच्या अनेक तक्रारी आपल्याला ऐकायला मिळतात. कधी प्रवास नाकारतात तर कधी जवळच्या अंतरावर जाण्यास नकार देतात. अशातच अभिनेता प्रसाद ओकची पत्नी मंजिरी ओक हिने एका रिक्षाचालकाचा व्हिडीओ पोस्ट करत वेगळीच तक्रार केली आहे. मंजिरीने इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या या व्हिडीओमध्ये एक रिक्षाचालक त्याच्या मोबाइल फोनमध्ये रील्स आणि व्हिडीओ बघत रिक्षा चालवताना दिसतोय. यावरून मंजिरीने तीव्र संताप व्यक्त केला आहे. इतकंच नव्हे तर दोन वेळा सांगूनही संबंधित रिक्षाचालकाने रील्स बघणं बंद केलं नाही. अखेर नाईलाजाने मंजिरीने रिक्षाच बदलली. हा संपूर्ण प्रकार तिने या पोस्टमध्ये सांगितला आहे.
‘पैसे देऊन आणि वर आपला जीव मुठीत घेऊन असा प्रवास का करायचा? आणि यावर यांना काही बोलायचं नाही. कारण यांचीच अरेरावी ऐकून घ्यायला लागेल. दोनदा सांगूनही काही सुधारणा न झाल्यामुळे मी रिक्षा बदलली आणि तरी ही त्याला काही फरक पडला नाही. म्हणजे भाडं गेलं तरी चालेल, समोरच्याचा आणि स्वतःचाही जीव धोक्यात घालीन. पण मी रिक्षा चालवताना असा फोन बघणारच. पूर्ण वेळ हा असाच रिक्षा चालवतो असं अत्यंत अभिमानानी सांगितलं त्यांने मला… एकूणच कठीण आहे सगळं. देव त्याला अक्कल देवो,’ अशा शब्दांत मंजिरीने संताप व्यक्त केला.
मंजिरीच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनीही विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘सहमत आहे, हा प्रकार वाढलाय आणि यांची अरेरावी पण’, असं एका युजरने म्हटलंय. तर ‘रिक्षाचा नंबर आणि त्याचा व्हिडीओ पोलिसांना किंवा आरटीओला पाठवा. खूप लोकांनी हे केलं तर काहीतरी कारवाई होईलच’, असं दुसऱ्याने लिहिलं आहे. ‘असाच अनुभव मलाही आला. मीसुद्धा संबंधित रिक्षाचालकाला मोबाइल बंद करायला सांगितलं’, असं एका युजरने म्हटलं आहे. ‘ठाण्यात हे जास्त झालंय आजकाल. ठाणे स्टेशनपासून जाणाऱ्या सर्व रिक्षाचालक सर्रास मोबाइल वापरतात’, अशी तक्रार आणखी एका नेटकऱ्याने केली.