अभिनेता प्रसाद ओकची मुख्य भूमिका असलेला ‘धर्मवीर 2’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. ‘धर्मवीर: मुक्काम पोष्ट ठाणे’ या पहिल्या भागानेही दमदार कामगिरी केली होती. यात प्रसादने धर्मवीर आनंद दिघे यांची भूमिका साकारली आहे. या चित्रपटानिमित्त जेव्हा काही राजकीय व्यक्तिमत्त्वांशी प्रसाद ओकच्या भेटीगाठी झाल्या, तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. इतकंच नव्हे तर जेव्हा त्याने मुंबईत हक्काचं घर घेतलं, तेव्हासुद्धा नेटकऱ्यांकडून प्रश्न उपस्थित करण्यात आले. यावर प्रसादने विविध मुलाखतींमध्ये प्रतिक्रिया दिली होती. आता एका मुलाखतीत प्रसादची पत्नी मंजिरी ओक या ट्रोलिंगवर मोकळेपणे व्यक्त झाली.
‘लोकमत फिल्मी’ला दिलेल्या मुलाखतीत मंजिरी म्हणाली, “धर्मवीर प्रदर्शित झाला तेव्हा माझ्या मोठ्या मुलाने मला फोन करून सांगितलं होतं की, आता तू सायकल जरी घेतलीस ना तरी ती आपल्याला कोणीतरी दिलेलीच असणार आहे. तुझ्या घरात स्टीलचा डबा जरी घेतलास, तरी तो कोणीतरी तुला दिलेलाच असणार आहे. याची आधीच तयारी ठेव. माझा मोठा मुलगा खूप समंजस आहे. काही दिवसांपूर्वी जेव्हा त्याने प्रसादला गाडी दिली, तेव्हा मी त्याला विचारलं की सोशल मीडियावर पोस्ट करायचं का? तू म्हटलंस तर करू नाहीतर नको. त्यावर विचार करायला त्याने वेळ घेतला. काय करूयात, काय नको याचा त्याने विचार केला. अखेर तो म्हणाला की करुयात चल. आपण पोस्ट नाही केलं तरी लोक बोलणार आणि केलं तरी बोलणार. मग आपल्या आनंदात जे दहा लोकं प्रामाणिकपणे सहभागी होतील, त्यांच्यासोबत हा आनंद शेअर करूयात.”
याविषयी ती पुढे म्हणाली, “पूर्वी मला पोस्टवरील कमेंट्स वाचून त्रास व्हायचा. प्रसाद मला ओरडतो की तू कमेंट्स का वाचतेस? पण आता मला ते वाचून हसायला येतं. हसण्यासाठीच मी ते वाचते. एकाने लिहिलं होतं, नक्की तुमचा मुलगा काय करतो? त्याची आयटीआर टाका इकडे. मी प्रसादला म्हटलं, जरी आपण मुलाची आयटीआर टाकली, तरी ते म्हणणार की हे तुम्ही कोणाकडून तरी बनवून घेतलंय. तुम्ही थांबणारच नाही आहात. जे लोक मला किंवा प्रसादला ओळखत नाहीत, ते काय म्हणतात याने फरक पडत नाही. पण जेव्हा आपल्या जवळचे बोलतात, जे आमच्या कानावर येतं, ठराविक काही नावांसकट तेव्हा त्याचा त्रास होतो. आम्ही अत्यंत अभिमानाने तो दिवस मिळवला आहे. हफ्ते भरण्यासाठीचा स्ट्रगल आजही सुरू आहे. त्यामुळे या गोष्टी कोणाला आणि किती सांगणार आपण? “