‘बालिका वधू’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीने वयाच्या 24 व्या वर्षी आत्महत्या केली होती. 1 एप्रिल 2016 रोजी तिने अखेरचा निरोप घेतला. आता प्रत्युषाच्या मृत्यूच्या नऊ वर्षांनंतर तिचा एक्स बॉयफ्रेंड राहुल राज सिंहने टीव्ही अभिनेत्री काम्या पंजाबीवर काही धक्कादायक आरोप केले आहेत. प्रत्युषाच्या आत्महत्येप्रकरणी राहुलवर काही आरोप करण्यात आले होते. आता राहुलने काम्या पंजाबी आणि विकास गुप्ता यांच्याबद्दल दावा केलाय की त्यांनी प्रत्युषाच्या हत्येप्रकरणात त्याच्यावर चुकीचे आरोप केले होते.
सुभोजित घोषच्या पॉडकास्ट मुलाखतीत बोलताना राहुल म्हणाला की, “प्रत्युषाची हत्या झाल्याची अफवा काम्यानेच पसरवायला सुरुवात केली होती. त्यानंतर राखी सावंत आणि विकास गुप्ता यांनी तिला प्रोत्साहन दिलं. काम्या पंजाबी आणि विकास गुप्ता यांनी मुद्दाम याप्रकरणात उडी घेतली होती. त्यांनी माझ्यावर आरोप केले की मी प्रत्युषाची हत्या केली. हीच गोष्ट मी त्यांच्या मुलाखतींमध्ये पाहिली होती. प्रत्युषावर कोणतंच आर्थिक संकट नव्हतं आणि तिच्या हाती काम होतं, असा दावा त्यांनी केला होता. परंतु विकास गुप्ताने कधीच प्रत्युषाला कामाची ऑफर दिली नव्हती.”
“काम्या पंजाबीने प्रत्युषाकडून अडीच लाख रुपये उधारीने घेतले होते. जे तिने कधीच परत केले नव्हते. मी त्यावेळी काम्याला ओळखत नव्हतो. प्रत्युषाने माझी तिच्याशी एका पार्टीत भेट करून दिली होती. त्यावेळी काम्या पूर्णपणे नशेत होती. प्रत्युषाने दिला अडीच लाख रुपये उधारीने दिले होते. ते पैसे तिने कधीच परत केले नाहीत. काम्याने म्हटलं होतं की तिच्या हाती कोणतंच काम नाही. काम मिळालं की लगेच पैसे परत देईल. पण ती लोकं सतत मद्यपान करायचे. प्रत्युषानेही मद्यपान सोडावं अशी माझी इच्छा होती. तिचे मित्रमैत्रिणी खूप पार्ट्या करायचे. काम्यानेच प्रत्युषाला मद्यपानाचं व्यसन लावलं होतं. प्रत्युषाला माहीत होतं की मी तिच्या भल्यासाठीच तिला मद्यपान बंद करायला सांगत होतो. म्हणून तिने पार्ट्यांना जाणं बंद केलं होतं”, असं तो पुढे म्हणाला.
“प्रत्युषाने पार्ट्यांना जाणं बंद केल्याने तिच्या मित्रांसाठी मी व्हिलन बनलो होतो. त्यांना असं वाटलं की मी प्रत्युषाला त्यांच्यापासून दूर करतोय. काम्याला सतत पार्ट्यांची सवय आहे, हे सर्वांना माहितीये”, असं म्हणत राहुलने त्याची बाजू मांडली.