पुणे | 2 ऑगस्ट 2023 : प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या निधनाने कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तींनी त्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. कर्जाच्या समस्येमुळे त्यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र नितीन देसाईंनी त्यांची ही समस्या कधीच कोणासमोर बोलून दाखवली नाही. अभिनेते, दिग्दर्शक प्रवीण तरडे हे त्यांना गेल्या 21-22 वर्षांपासून ओळखतात. नितीन देसाई यांच्या आत्महत्येचं वृत्त ऐकून त्यांनाही मोठा धक्का बसला. दोन आठवड्यांपूर्वीच त्यांनी नितीन देसाई यांची भेट घेतली होती. मात्र या भेटीदरम्यान आपण त्यांचं मन मोकळं करू शकलो नाही याची खंत तरडेंनी व्यक्त केली.
“मराठी माणसाचं खूप मोठं नुकसान झालं. बॉलिवूड ही खूप मोठी नगरी आहे आणि त्यात हाताच्या बोटावर मोजता येतील इतकीच मराठी माणसं यशस्वी आहेत. नंबर एकचं यसश्वीपण नितीन देसाईंनी कमावलं होतं. भारतातल्या मोठ्या स्टुडिओंपैकी एक म्हणजे त्यांचा एनडी स्टुडिओ. भारतीय सिनेसृष्टीचं मोठं नुकसान झालं आहे. दोन आठवड्यांपूर्वी मी त्यांना भेटलो होतो. आमचं 21-22 वर्षे जुनं संबंध होतं. 2001 मध्ये अमोल पालेकर यांच्या ‘अनाहत’ चित्रपटासाठी मी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं. त्या चित्रपटासाठी नितीन देसाई कला दिग्दर्शक म्हणून काम करत होते. तेव्हापासून त्यांच्यासोबत तासनतास गप्पा रंगायच्या”, असं ते म्हणाले.
“त्यांच्यासाठी मी काहीतरी लिहावं अशी त्यांची खूप इच्छा होती. म्हणून ‘ट्रकभर स्वप्नं’ ही त्यांची निर्मिती असलेल्या चित्रपटासाठी मी संवाद लिहिले होते. दोन आठवड्यांपूर्वी मी माझ्या नव्या सिनेमाचा सेट पहायला त्यांच्याकडे गेलो होतो. माझ्यासोबत महेश लिमयेसुद्धा होता. त्यांना मी मस्करीत म्हटलं की मराठी चित्रपटाचं शूटिंग तुमच्या स्टुडिओमध्ये करणं परवडत नाही. त्यावर ते म्हणाले, तुमचं जेवढं बजेट असेल त्यात तुम्ही शूटिंग करा. त्यांनी मला त्यांच्या एनडी स्टुडिओमधील पाहिजे ती गोष्ट वापरण्याची परवानगी दिली होती. त्यांचा तो उत्साह बघत राहावासा वाटायचा”, अशा शब्दांत त्यांनी अनुभव सांगितला.
नितीन देसाई यांच्याशी बोललो पण त्यांचं मन मोकळं करू शकलो नाही याची खंत प्रवीण तरडेंनी यावेळी व्यक्त केली. ते पुढे म्हणाले, “आपण माणसाशी बोलतो पण माणसाचं मन मोकळं करतो का? या भेटीत मी त्यांच्याशी माझ्या सिनेमाबद्दल बोललो, सेटबद्दल बोललो. पण त्यांच्याबद्दल मी काही बोललोच नाही. 22 वर्षांपूर्वी आम्ही कर्नाटकमध्ये शूटिंग करत होतो. त्यावेळी मी सहाय्यक दिग्दर्शक होतो आणि नितीन देसाईंशी बोलायला मिळणं हीसुद्धा खूप मोठी गोष्टी होती. त्यांनी मला जवळ बोलावून माझ्या कामाचं कौतुक केलं. चांगला दिग्दर्शक होशील, असं ते म्हणाले होते.”
“जे जे नितीन देसाईंसोबत राहिलेत, सर्व लेखक, दिग्दर्शक, अभिनेते, तंत्रज्ञ यांना त्यांच्या अशा टोकाचं पाऊल उचलण्यावर विश्वास बसणारच नाही. सतत पुढचं बोलणारा, उत्साही माणूस, सतत नवनिर्माण, भव्यदिव्यतेवर बोलणारा माणूस.. असं का करावं? हे त्यांनाच माहीत. पण कोणी असं स्वप्नातसुद्धा विचार केला नसेल”, असंदेखील ते म्हणाले.