शशांक सिंह आणि आशुतोष शर्मा यांच्या निर्णायक खेळीच्या जोरावर पंजाब किंग्जने गुरुवारी झालेल्या ‘आयपीएल’ सामन्यात गुजरात टायटन्सवर तीन गडी रोखून रोमांचक विजय नोंदवला. या विजयानंतर पंजाब किंग्जची मालकीण प्रिती झिंटाने शशांकसोबतचा एक सेल्फी पोस्ट केला. या सेल्फीसोबतच तिने भलीमोठी पोस्ट लिहिली. आयपीएलच्या लिलावादरम्यान प्रिती झिंटा आणि नेस वाडिया यांनी गोंधळून शशांक सिंहवर बोली लावली होती. प्रितीला खरंतर शशांकला तिच्या संघात घ्यायचं नव्हतं. मात्र चुकून लावलेल्या बोलीमुळे तो पंजाब किंग्जचा भाग झाला, अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली. या चर्चांवरदेखील प्रितीने या पोस्टच्या माध्यमातून मौन सोडलं आहे.
शशांकसोबतचा सेल्फी पोस्ट करत प्रितीने लिहिलं, ‘गेल्या काही दिवसांपासून लिलावाबद्दल होणाऱ्या चर्चांवर बोलण्याचा आजचा दिवस अत्यंत योग्य आहे. अशा परिस्थितीत अनेकजण आत्मविश्वास गमावतात, दबावाखाली येतात किंवा निराश होतात. पण शशांक याला अपवाद ठरला. तो त्या इतर अनेकांसारखा नाही. तो खरंच खास आहे. केवळ एक खेळाडू म्हणून त्याच्या कौशल्यामुळे नाही तर सकारात्मक वृत्ती आणि स्वत:वरील विश्वासामुळे तो खास आहे. त्याने त्या सर्व टीका, टिप्पण्ण्यांचा स्वत:वर परिणाम होऊ दिला नाही. त्याने स्वत:ला सिद्ध करून दाखवलं आणि त्यासाठी मी त्याचं कौतुक आणि आदर करते.’
‘जेव्हा आयुष्य वेगळं वळण घेतं आणि ठरल्याप्रमाणे काहीच घडत नाही तेव्हा इतर काय विचार करतात यापेक्षा आपण स्वत:विषयी काय विचार करतो हे महत्त्वाचं असल्याचं त्याने दाखवलंय. सर्वांसाठी तो एक उदाहरण आहे. त्यामुळे शशांकसारखंच तुम्हीसुद्धा स्वत:वर कायम विश्वास ठेवा. असं केल्यास तुम्हीसुद्धा तुमच्या आयुष्यातील खेळाचे ‘मॅन ऑफ द मॅच’ ठराल याची मला खात्री आहे’, अशा शब्दांत प्रितीने शशांकचं कौतुक केलं.
प्रितीच्या या पोस्टवर शशांकनेही कमेंट केली आहे. ‘या कौतुकाच्या शब्दांसाठी मी तुमचे खूप आभार मानतो. पहिल्या दिवसापासून तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला होता. पंजाब किंग्ज या संघासाठी खेळायला मिळणं ही माझ्यासाठी खूप मोठी संधी आहे. या संघात प्रचंड सकारात्मकता आहे. मला पाठिंबा दिल्याबद्दल धन्यवाद’, असं त्याने लिहिलंय.