कॉर्डेलिया क्रूझवरील ड्रग्ज प्रकरणी (Cordelia cruise drugs case) अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानविरोधात (Aryan Khan) पुरावे नसल्याचं ठरवणं हे घाईचं होईल, असं अमलीपदार्थ नियंत्रण विभागाने (NCB) स्पष्ट केलं आहे. आर्यन हा अमली पदार्थांच्या मोठ्या कटाचा किंवा आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्करी रॅकेटचा भाग होता याचा कोणताही पुरावा नाही, असं वृत्त समोर आलं होतं. त्यानंतर एनसीबी प्रमुखांनी स्पष्टीकरण दिलं. ‘मिड डे’ला दिलेल्या मुलाखतीत एनसीबीच्या विशेष तपास पथकाने प्रमुख संजय सिंह म्हणाले, “आर्यनविरोधात पुरावे नसल्याचं म्हणणं खूपच घाईचं होईल. आमचा तपास अद्याप सुरू आहे आणि याप्रकरणी आम्ही आतापर्यंत अनेकांचे जबाब नोंदवले आहेत. पण आम्ही कोणत्याही निष्कर्षापर्यंत अद्याप पोहोचलो नाही.” गेल्या वर्षी 2 ऑक्टोबर रोजी एनसीबीचे माजी विभागीय आयुक्त समीर वानखेडे यांनी त्यांच्या टीमसोबत कॉर्डेलिया क्रूझवर छापा टाकला होता. या छाप्यात एनसीबीने क्रूझमधून 13 ग्रॅम कोकेन, पाच ग्रॅम मेफेड्रॉन, 21 ग्रॅम गांजा, MDMAच्या 22 गोळ्या आणि रोख 1.33 लाख रुपये जप्त केले होते. एनसीबीने 14 जणांना रोखलं होतं आणि काही तासांच्या चौकशीनंतर 3 ऑक्टोबर रोजी दुपारी आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुम धामेचा यांना अटक केली होती.
“माध्यमांमध्ये जे वृत्त दाखवलं जात आहे, त्यात काही तथ्य नाही. ते केवळ अंदाज वर्तवले जात आहेत. शिवाय या अहवालांची एनसीबीकडे तपासणी केली गेली नाही. अद्याप तपास पूर्ण झालेला नाही. त्यामुळे या टप्प्यावर काहीही सांगता येणार नाही”, असं सिंह पुढे म्हणाले. आर्यन खानकडे ड्रग्ज आढळलेच नव्हते, त्यामुळे त्याचा फोन घेऊन त्याचे चॅट्स तपासण्याची गरज नव्हती, असे निष्कर्ष एसआयटीने काढल्याचं वृत्त समोर आलं होतं. मात्र हे वृत्त संदीप सिंह यांनी फेटाळले आहेत.
आर्यन खान आणि इतर आरोपींच्या व्हॉट्सअॅप चॅट्सचा आधार घेत वानखेडे यांच्या टीमने दावा केला की हे आरोपी ड्रग्ज तस्करीच्या मोठ्या कटाचा भाग आहेत. आर्यन खान काही परदेशी ड्रग्ज सप्लायरच्या संपर्कात होता आणि त्याच्या चॅटमध्ये ‘हार्ड ड्रग्ज’ आणि ‘मोठ्या प्रमाणात’ असा उल्लेख असल्याचा आरोप त्यांनी केला होता. जवळपास महिनाभर कारागृहात राहिल्यानंतर आर्यन खानची गेल्या वर्षी २८ ऑक्टोबर रोजी जामिनावर सुटका झाली होती.
संबंधित बातम्या: आर्यन खान प्रकरणाचं राष्ट्रवादी कनेक्शन ?