मुंबई : गुन्हेगारी विश्वातून राजकारणातून आलेला माजी खासदार अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशर्रफ यांची शनिवारी रात्री अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. त्यांना वैद्यकीय चाचणीसाठी प्रयागराज इथल्या वैद्यकीय महाविद्यालयात नेताना पोलिसांच्या ताब्यात असताना हा हल्ला झाला. याप्रकरणी पोलिसांनी तीन हल्लेखोरांना अटक केली आहे. अतिकच्या हत्येप्रकरणी विविध क्षेत्रांतून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. यामध्ये बॉलिवूड सेलिब्रिटींचाही समावेश आहे. स्वरा भास्कर, कंगना रनौत यांच्यानंतर आता अभिनेत्री प्रियांका चोप्राच्या चुलत बहिणीची पोस्ट चर्चेत आली आहे.
प्रियांकाची बहीण मीरा चोप्रा हीसुद्धा अभिनेत्री आहे. सोशल मीडियावर ती बरीच सक्रिय असते. तिने बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. अतिक अहमदच्या हत्येनंतर मीराने ट्विटरवर एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये तिने उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना रॉकस्टार म्हटलंय. या पोस्टमध्ये तिने अतिक अहमदचा हॅशटॅग वापरला आहे.
अतिकवर विविध प्रकारचे सुमारे 100 गुन्हे दाखल होते. उमेश पाल हत्याप्रकरणातील आरोपी असलेला अतिकचा मुलगा असाद आणि असादचा साथीदार गुलाम हे गुरुवारी झाशी इथलं पोलीस चकमकीत ठार झाले होते. त्यानंतर शनिवारी अतिक आणि त्याचा भाऊ अशर्रफ यांना उमेल पाल हत्येप्रकरणात पोलीस वैद्यकीय चाचणीसाठी प्रयागराजला घेऊन आले होते. त्यावेळी हल्ला झाला.
अतिक आणि अशर्रफ यांना प्रयागराज इथल्या रुग्णालयात वैद्यकीय चाचणीसाठी नेण्यात येत असताना हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. हल्लेखोर अगदी जवळून त्यांच्यावर गोळीबार करत असल्याचं दृश्य सीसीटीव्हीत चित्रित झालं आहे. गोळीबारानंतर परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झाल्याने अहमद आणि अशर्रफ यांचं गोळ्यांनी चाळण झालेले मृतदेह घटनास्थळावरून तातडीने हलवण्यात आले. 2005 मधील उमेश पाल हत्येप्रकरणी या दोघांना प्रयागराज इथं आणण्यात आलं होतं.
… @myogiadityanath is a rockstar!!#AtikAhmed
— Meera Chopra (@MeerraChopra) April 15, 2023
मीराने 2005 मध्ये ‘अन्बे आरुयिरे’ या तमिळ चित्रपटातून पदार्पण केलं. यामध्ये तिने एसजे सूर्यासोबत भूमिका साकारली होती. त्यानंतर तिने पवन कल्याणसोबत दुसरा तेलुगू चित्रपट केला. विक्रम भट्ट यांच्या ‘1920 : लंडन’ चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तिने सतीश कौशिक यांच्या ‘गँग ऑफ घोस्ट्स’मध्येही भूमिका साकारली आहे.