मुंबई: बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत आपली विशेष छाप सोडणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा गेल्या काही दिवसांपासून मुंबईत आहे. मुंबईत आल्यापासून ती कधी तिच्या विविध ब्रँड्सच्या प्रमोशनमध्ये तर कधी युनिसेफच्या कामात व्यग्र आहे. मिस वर्ल्डचा किताब जिंकल्यापासून बॉलिवूडच्या या ‘देसी गर्ल’ने मागे वळून पाहिलं नाही. मात्र हे सर्व यश मिळवण्यासाठी ती भूतांची पूजा करते असं काही लोकांना वाटतं. याविषयी एका पॉडकास्ट मुलाखतीत तिला प्रश्न विचारण्यात आला.
अपेक्षित यश मिळवण्यासाठी प्रियांका चोप्राने भूतांची पूजा केली का, असा प्रश्न तिला या मुलाखतीत विचारण्यात आला होता. त्यावर ती आधी हसली आणि म्हणाली, “भयंकर आहे हे. शिव जी माझ्यावर नाराज होतील.” मिस वर्ल्डचा किताब जिंकल्याने चित्रपटांचे ऑफर मिळू लागले आणि प्रसिद्धी मिळाली, असंही तिने सांगितलं.
करिअरच्या शिखरावर असताना काही लोकांनी मला खूप त्रास दिला, असाही खुलासा तिने या मुलाखतीत केला. “माझं करिअर खूप छान चाललं होतं, म्हणून काही लोकांना ते पटलं नाही. मला प्रोजेक्ट्स मिळू नये यासाठी त्यांनी प्रयत्न केले”, असं ती म्हणाली. मात्र यावेळी तिने कोणाचंच नाव घेतलं नाही.
2000 मध्ये मिस इंडिया आणि त्यानंतर मिस वर्ल्डचा किताब जिंकल्यानंतर प्रियांकाने अभिनयविश्वात पदार्पण केलं. ‘हिरो: लव्ह स्टोरी ऑफ अ स्पाय’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. इंडस्ट्रीत यश मिळवल्यानंतर तिने हॉलिवूडकडे आपला मोर्चा वळवला. क्वांटिको या अमेरिकन टीव्ही शोमुळे तिला हॉलिवूडमध्ये प्रसिद्धी मिळाली.
2018 मध्ये प्रियांकाने निक जोनासशी लग्न केलं. त्यानंतर ती परदेशी स्थायिक झाली. काही कामानिमित्त किंवा चित्रपटाच्या शूटिंगसाठी ती भारतात परतते. याच वर्षी जानेवारी महिन्यात तिने सरोगसीच्या माध्यमातून मुलीला जन्म दिला. मालती मेरी चोप्रा जोनास असं तिचं नाव आहे.