बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ अर्थात अभिनेत्री प्रियांका चोप्राने सातासमुद्रापार जाऊन हॉलिवूडमध्येही आपली वेगळी ओळख निर्माण केली. आपल्या दमदार अभिनयकौशल्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या प्रियांकासाठी फिल्म इंडस्ट्रीतील प्रवास काही सोपा नव्हता. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिची आई मधू चोप्रा यांनी फिल्म इंडस्ट्रीतील प्रियांकाच्या सुरुवातीच्या दिवसांमधील संघर्षाविषयी सांगितलं. माध्यमांमुळे त्यांच्या खासगी आयुष्यावर कसा परिणाम झाला, याविषयीही त्या मोकळेपणे व्यक्त झाल्या. मधू चोप्रा यांनी सांगितलं की, त्यांच्या कुटुंबाला अभिनय क्षेत्राची कोणतीच पार्श्वभूमी नसल्याने सुरुवातीला माध्यमांचा काय परिणाम होईल, हे समजलं नव्हतं. पण जेव्हा मीडियामध्ये प्रियांकाविषयी नकारात्मक बोललं जाऊ लागलं, तेव्हा त्यांना धक्काच बसला होता. असं असूनही प्रियांकाच्या क्षमतेवर विश्वास असल्याने त्या आव्हानात्मक परिस्थितीचा सामना करू शकलो, हे मधू यांनी मान्य केलं.
‘ब्रेकिंग स्टिरिओटाइप्स’ या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत मधू म्हणाल्या, “आम्ही या सगळ्या गोष्टींसाठी खूपच नवीन होतो. आम्ही एका वेगळ्याच इंडस्ट्रीतून होतो. मी आणि माझे पती डॉक्टर्स होतो आणि फिल्म इंडस्ट्री आमच्यासाठी पूर्णपणे नवीन होती. या इंडस्ट्रीबद्दल आमच्या मनात खूप सकारात्मक भावना होती. हे एखाद्या नर्कासारखं असेल असा आम्ही विचारसुद्धा केला नव्हता. आम्ही जेव्हा इथे आलो तेव्हा असे नकारात्मक विचार आमच्या मनातसुद्धा आले नव्हते.”
प्रियांका जेव्हा बॉलिवूडमध्ये काम करू लागली, तेव्हा त्यांना या इंडस्ट्रीचं खरं रुप हळूहळू दिसू लागलं होतं. तरीसुद्धा तिच्या प्रतिभेवर विश्वास ठेवून पुढे जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. “या इंडस्ट्रीतील कचरा आम्ही पाहिला. सुरुवातीला प्रियांकाविषयी आम्हाला फार वाईट वाटायचं. पण तिने आम्हा दोघांना बसवलं आणि सांगितलं, आई तू मला खूप चांगल्याप्रकारे ओळखतेस. मग या सगळ्या वाईट गोष्टींवर का विश्वास ठेवतेस? प्रियांकाने समजावल्यानंतर आम्ही हळूहळू त्यातून सावरू लागलो”, असं मधू पुढे म्हणाल्या.
प्रियांका चोप्राने 2002 मध्ये ‘तमिझान’ या तमिळ चित्रपटातून कारकिर्दीची सुरुवात केली. तिने ‘डॉन’, ‘कमिने’, ‘फॅशन’, ‘सात खून माफ’, ‘बर्फी’, ‘मुझसे शादी करोगी’ यांसारख्या बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केलं. त्यानंतर तिने हॉलिवूडकडे आपला मोर्चा वळवला. ‘बेवॉच’, ‘अ किड लाइक जेक’, ‘द मॅट्रिक्स रिसरेक्शन्स’, ‘लव्ह अगेन’ यांसारख्या हॉलिवूड चित्रपटांमध्ये तिने भूमिका साकारल्या आहेत.