मुंबई: ‘लाडला’, ‘बोल राधा बोला’ आणि ‘दस’ यांसारख्या चित्रपटांचे निर्माते नितीन मनमोहन यांना हृदयविकाराचा झटका आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचं समजतंय. आयसीयूमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू असून ते सध्या व्हेंटिलेटरवर आहेत. शनिवारी रात्री त्यांना हार्ट अटॅक आला. त्यानंतर त्यांना मुंबईतील धीरुभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या त्यांची प्रकृती गंभीर आहे.
नितीन मनमोहन हे गेल्या दोन दिवसांपासून डॉक्टरांच्या देखरेखीत आहेत. मात्र त्यांच्या तब्येतीत अपेक्षित सुधारणा झाली नाही, अशी माहिती डॉक्टरांनी दिली. नितीन यांच्या प्रकृतीविषयी कळताच अभिनेता अक्षय खन्ना त्यांची भेट घेण्यासाठी रुग्णालयात पोहोचला आहे. अक्षयने ‘सब कुशल मंगल’ या चित्रपटासाठी नितीन यांच्यासोबत काम केलं होतं.
नितीन मनमोहन हे बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते मनमोहन यांचे पुत्र आहेत. मनमोहन हे ‘ब्रह्मचारी’, ‘गुमनाम’ आणि ‘नया जमाना’ या चित्रपटांसाठी ओळखले जातात.
अभिनेता संजय दत्तचा माजी सचिव कलीम सतत त्यांच्यासोबत रुग्णालयात आहे. कलीम आणि नितीन हे बऱ्याच कालावधीपासून एकमेकांचे चांगले मित्र आहेत. नितीन यांचे कुटुंबीयही चिंतेत आहेत. काही जण त्यांच्यासोबत रुग्णालयात आहेत तर काही जण त्यांची भेट घेण्यासाठी येणार आहेत, अशीही माहिती समोर येत आहे.
नितीन हे निर्मात्यासोबतच उत्तम अभिनेतेसुद्धा आहेत. त्यांनी दूरदर्शनवरील ‘भारत के शहीद’ या मालिकेत चंद्रशेखर आझाद यांची व्यक्तिरेखा साकारली होती.