दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना आणि फहाद फासिल यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘पुष्पा 2: द रुल’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन सुरू आहे. पाटणामध्ये या चित्रपटाचा ट्रेलर धूमधडाक्यात लाँच झाला. त्यानंतर रविवारी 24 नोव्हेंबर रोजी ‘पुष्पा 2’मधील आयटम साँग लाँच करण्यात आला. ‘पुष्पा’च्या पहिल्या भागात अभिनेत्री समंथा रुथ प्रभू आयटम साँगमध्ये झळकली होती. ‘ऊ अंटावा’ हे तिचं गाणं आजही तितकंच लोकप्रिय आहे. मात्र दुसऱ्या भागात समंथाची जागा दाक्षिणात्य अभिनेत्री श्रीलीलाने घेतली आहे. तिच्या या गाण्याचं नाव ‘किसिक’ असं आहे. सोशल मीडियावर हे गाणं लाँच होताच नेटकऱ्यांकडून प्रतिक्रियांचा वर्षाव होऊ लागला आहे. अनेकांनी या गाण्याची तुलना समंथाच्या ‘ऊ अंटावा’शी करत नाराजी व्यक्त केली आहे.
‘मान्य करा अथवा नको, पण किसिक हे गाणं पुष्पासाठी नकारात्मक ठरेल’, असं एकाने लिहिलं. तर ‘समंथाचा ‘ऊ अंटावा’ या गाण्यापेक्षा 1000 पटींनी भारी होता’, असं दुसऱ्याने म्हटलंय. ‘या गाण्यात ऊ अंटावासारखी खास गोष्ट नाही’, असंही मत नेटकऱ्यांनी नोंदवलंय. ‘पुष्पा 2’मधील या गाण्यासाठी पुन्हा एकदा समंथाला विचारण्यात आलं होतं. मात्र आजारपणामुळे तिने या गाण्याला नकार दिला होता. त्यानंतर अभिनेत्री श्रद्धा कपूरला ऑफर देण्यात आली होती. पण श्रद्धाने मानधन अव्वाच्या सव्वा मागितल्याने अखेर श्रीलीलाची या गाण्यासाठी निवड झाली.
अभिनेत्री श्रीलीलाचा जन्म मिशीगनमध्ये 2001 मध्ये झाला. लहानपणापासूनच तिने भरतनाट्यम शिकण्यास सुरुवात केली होती. बालकलाकार म्हणून तिने चित्रपटांमध्येही काम केलंय. 2019 मध्ये तिने ‘किस’ या कन्नड चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती. त्यानंतर 2021 मध्ये ती ‘पेल्ली संदडा’ या तेलुगू चित्रपटात झळकली होती. ‘धमाका’ या चित्रपटातील भूमिकेसाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा SIIMA पुरस्कार मिळाला.
‘पुष्पा: द राईज’ या चित्रपटात समंथाने तिच्या करिअरमधील पहिला आयटम साँग केला होता. जवळपास 3 मिनिटांच्या या गाण्यासाठी तिने तब्बल पाच कोटी रुपये मानधन घेतल्याचं म्हटलं जात होतं. या गाण्यात समंथाने आपल्या मादक अदांनी चाहत्यांना घायाळ केलं. अजूनही सोशल मीडियावर ‘ऊ अंटावा’ची क्रेझ पहायला मिळते. पार्ट्यांमध्येही हे गाणं वाजलं की त्याच्या हुकस्टेपवर सर्वांचे पाय थिरकतात. ‘पुष्पा’मधील हा आयटम साँग आतापर्यंत तेलुगू, हिंदी आणि तमिळ भाषेत प्रदर्शित झाला. प्रत्येक भाषेतील या गाण्याला तुफान प्रतिसाद मिळाला.