हैदराबादमधील ‘संध्या’ थिएटरमध्ये ‘पुष्पा 2’ या चित्रपटाच्या प्रीमिअरदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत दुखापतग्रस्त झालेल्या मुलाने तब्बल 20 दिवसांनंतर प्रतिसाद दिला आहे. मंगळवारी मुलाच्या वडिलांनी याबद्दलची माहिती दिली. संध्या थिएटरमध्ये अभिनेता अल्लू अर्जुनला पाहण्यासाठी चाहत्यांनी एकच गर्दी केली होती. यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत एम. रेवती नावाच्या महिलेचा मृत्यू झाला. तर तिचा नऊ वर्षांचा मुलगा अत्यवस्थ होता. मंगळवारी माध्यमांशी बोलताना मुलाच्या वडिलांनी मदत करणाऱ्यांचे आभार मानले. “वीस दिवसांनंतर माझ्या मुलाने पहिल्यांदा प्रतिसाद दिला आहे. अल्लू अर्जुन आणि तेलंगणा सरकार आमची खूप मदत करत आहेत”, असं मुलाचे वडील भास्कर म्हणाले.
दुसरीकडे अभिनेता अल्लू अर्जुनची पोलिसांनी मंगळवारी तीन तासांपेक्षा जास्त काळ कसून चौकशी केली. अल्लू अर्जुनला पोलिसांसमोर उपस्थित राहण्यासाठी 23 डिसेंबरला नोटीस बजावण्यात आली होती. चेंगराचेंगरीच्या घटनेबद्दल उत्तरं देण्यासाठी आणि गरज पडल्यास घटनास्थळी भेट देण्यासाठी पोलीस ठाण्यात उपस्थित राहावं, असं त्यात नमून करण्यात आलं होतं. त्यानुसार मंगळवारी सकाळी 11 नंतर अल्लू अर्जुन त्याचे वडील अल्लू अरविंद आणि वकिलांबरोबर चिक्कडपल्ली पोलीस ठाण्यात हजर झाला. त्याची चौकशी दुपारी 2.45 पर्यंत चालली. पोलीस उपायुक्त अक्षांश यादव यांच्या नेतृत्त्वाखालील पोलीस पथकाने त्याची चौकशी केली.
चेंगराचेंगरीत झालेल्या मृत्यूप्रकरणी अल्लू अर्जुनला 13 डिसेंबर रोजी अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. याविरोधात त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली असता 50 हजार रुपयांच्या जातमुचल्यावर त्याला जामीन मिळाला. या जामिनाविरोधात तेलंगणा पोलीस उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचं कळतंय. महिलेच्या मृत्यूविषयी सांगितल्यानंतरही अल्लू अर्जुनने थिएटरमधून जाण्यास नकार दिल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे.
या संपूर्ण घटनेवरून तेलंगणामधील राजकारणही तापलं आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी चेंगराचेंगरीच्या घटनेवरून अल्लू अर्जुनवर आरोप केले. विधानसभेत याविषयी बोलताना त्यांनी खुलासा केला की,” पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव संध्या थिएटरमधील कार्यक्रमाला परवानगी नाकारली होती. तरीसुद्धा अल्लू अर्जुन तो पोहोचला आणि त्याने रोड शो केला. यामुळे परिस्थिती चिघळली.” यानंतर अल्लू अर्जुनने पत्रकार परिषद घेत हे सर्व आरोप फेटाळले.