अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा 2: द रुल’ हा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहोचली असताना आता सेन्सॉर बोर्डाने ‘पुष्पा 2’ला ‘U/A’ प्रमाणपत्र दिल्याचं कळतंय. सुकुमार दिग्दर्शित या चित्रपटातील काही संवाद आणि सीन्सवर सेन्सॉर बोर्डाने कात्रीही चालवण्याचे आदेश दिले आहेत. हे आक्षेपार्ह सीन्स आणि संवाद चित्रपटातून हटवल्यानंतर बोर्डाने प्रदर्शनाला हिरवा कंदिल दाखवला आहे. ‘बॉलिवूड हंगामा’ने दिलेल्या वृत्तानुसार, सेन्सॉर बोर्डाने ‘पुष्पा 2: द रुल’च्या निर्मात्यांना ‘r***i’ हा शब्द चित्रपटातील तीन ठिकाणांहून हटवण्यास सांगितलं आहे. याशिवाय ‘डेनगुड्डी’ आणि ‘वेंकटेश्वर’ हे शब्दही चित्रपटातून काढून टाकण्यात आले आहेत.
सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटातील अतिहिंसक सीन्सवरही कात्री चालवली आहे. यातील एका सीनमध्ये कापलेला पाय हवेत भिरकावण्यात आला आहे. हा सीन सेन्सॉर बोर्डाने चित्रपटातून काढून टाकण्यास सांगितलं आहे. तर दुसऱ्या सीनमध्ये अल्लू अर्जून त्याच्या हातात दुसऱ्या व्यक्तीचा कापलेला हात धरून उभा आहे. स्क्रीनवर हिंसक सीनची तीव्रता कमी करण्यासाठी सेन्सॉर बोर्डाने नायकाला झूम इन करायला सांगितलं आहे.
‘पुष्पा 2: द रूल’ या चित्रपटाचं दिग्दर्शन सुकुमार यांनी केलं असून 2021 मध्ये प्रदर्शित झालेल्या ब्लॉकबस्टर ‘पुष्पा: द राइज’ या चित्रपटाचा हा सीक्वेल आहे. पहिल्या भागात अल्लू अर्जुन, फहाद फासिल आणि रश्मिका मंदाना यांच्या मुख्य भूमिका होत्या. आता सीक्वेलमध्येही त्यांच्याच मुख्य भूमिका आहेत. या सीक्वेलचा बजेट तब्बल 300 कोटी असल्याचं म्हटलं जातंय. चित्रपटाच्या ट्रेलरला सोशल मीडियावर तुफान प्रतिसाद मिळत असून त्याला आतापर्यंत 1 कोटीपेक्षाही जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. ‘पुष्पा 2’ येत्या 5 डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे ओटीटी राइट्स तब्बल 270 कोटी रुपयांना विकले गेल्याचं कळतंय. त्यामुळे डिजिटल राइट्सच्याबाबतीत हा चित्रपट देशातील सर्वांत महागड्या चित्रपटांपैकी एक ठरला आहे.
‘पुष्पा: द राइज’ या चित्रपटातील भूमिकेसाठी अल्लू अर्जुनने सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार पटकावला होता. हा पुरस्कार पटकावणारा तो तेलुगू चित्रपटसृष्टीतील पहिला अभिनेता ठरला.