‘पुष्पा 2: द रुल’ या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. येत्या 5 डिसेंबर रोजी अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदानाचा हा चित्रपट जगभरात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटासाठी ॲडव्हान्स बुकिंग सुरू झाली असून त्यातही नवा विक्रम रचण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ‘पुष्पा 2’ हा चित्रपट रिलीजनंतर तुफान कमाई करेल, अशी अपेक्षा असतानाच आता ॲडव्हान्स बुकिंगमध्ये जबरदस्त गल्ला जमवल्याचं कळतंय. खरंतर एखाद्या चित्रपटाची ॲडव्हान्स बुकिंग दोन किंवा तीन दिवसांपूर्वी सुरू होते. मात्र ‘पुष्पा 2’बद्दल प्रेक्षकांमध्ये असलेली क्रेझ पाहून सहा दिवस आधीपासूनच म्हणजेच 30 नोव्हेंबरपासून ॲडव्हान्स बुकिंगची सुरुवात झाली आहे.
ॲडव्हान्स बुकिंग सुरू होऊन 24 तास उलटण्याआधीच या चित्रपटाची लाखो तिकिटं विकली गेली आहेत. या विक्रीतून आतापर्यंत 12 कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई झाली आहे. ‘सॅल्कनिक’ने दिलेल्या वृत्तानुसार, ‘पुष्पा 2’ने ॲडव्हान्स बुकिंगच्या 24 तासांत 2 लाख 48 हजार 384 तिकिटं विकली गेली आहेत. यासोबतच चित्रपटाने आतापर्यंत 7.49 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. ब्लॉक सीट्स मिळून कमाईचा हा आकडा 12.84 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. ॲडव्हान्स बुकिंगचा हा आकडा पाहून चित्रपटाची जबरदस्त ओपनिंग होणार असल्याचं स्पष्ट दिसतंय. सुकुमार दिग्दर्शित हा चित्रपट मूळ तेलुगू आणि तमिळ, मल्याळम, कन्नड, हिंदी या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करत आहेत. प्रमोशननिमित्त आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात अल्लू अर्जुनने रश्मिकाचं तोंडभरून कौतुक केलं. “मी दोन मिनिटांचा अवधी घेतो आणि रश्मिकाचे आभार मानतो. तिने या चित्रपटासाठी जे काही केलंय, त्यासाठी मी खूप कृतज्ञ आहे. तिला पाठिंबा खूप मोलाचा आहे. श्रीवल्लीच्या पाठिंब्याशिवाय हा चित्रपट पूर्णच होऊ शकत नाही. सेटवर तिच्यामुळे प्रचंड सकारात्मकता जाणवायची”, असं तो म्हणाला. रश्मिकाने ‘पुष्पा: द राइज’मध्ये श्रीवल्लीची भूमिका साकारली होती. तिची ही भूमिका आणि त्यातील गाणी देशभरात तुफान गाजली होती.
दरम्यान या चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहोचली असतानाच सेन्सॉर बोर्डाने ‘पुष्पा 2’ला ‘U/A’ प्रमाणपत्र दिलं आहे. तसंच या चित्रपटातील काही संवाद आणि सीन्सवर सेन्सॉर बोर्डाने कात्रीही चालवली आहे. हे आक्षेपार्ह सीन्स आणि संवाद चित्रपटातून हटवल्यानंतर बोर्डाने प्रदर्शनाला हिरवा कंदिल दाखवला आहे.