मुंबई : साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जून सध्या ‘पुष्पा : द रूल’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. अल्लू अर्जुनला बॉलिवूडच्या किंग खानने अर्थात शाहरुख खानने त्याच्या आगामी ‘जवान’ चित्रपटात पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारण्याची ऑफर दिल्याचं समजतंय. मात्र अल्लू अर्जुनने शाहरुखची ही ऑफर नाकारली आहे. जवान या चित्रपटाच्या टीमकडून अल्लू अर्जुनने कथा ऐकली. मात्र तारखांची जुळवाजुळव होऊ शकत नसल्याने त्याने नकार दिल्याचं कळतंय.
पुष्पा फेम अल्लू अर्जुनला जेव्हा शाहरुखच्या चित्रपटाच्या ऑफरविषयी समजलं, तेव्हा त्यातील भूमिकेबाबत विचार करण्यासाठी त्याने थोडा वेळ दिला. मात्र पुष्पा 2 चं शूटिंग जलदगतीने संपवण्याची कमिटमेंट असल्याने त्याने जवानची ऑफर नाकारली. सध्या वैझाग आणि हैदराबादमध्ये पुष्पा 2 चं शूटिंग सुरू आहे.
‘पुष्पा : द राईज’ या पहिल्या भागाला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळाला होता. फक्त दक्षिणेतच नाही तर संपूर्ण भारतात या चित्रपटाची क्रेझ पहायला मिळाली होती. त्यामुळे पुष्पा : द रूलसाठी अल्लू अर्जुन अधिक मेहनत घेत आहे. पुढील काही महिने तो फक्त याच चित्रपटावर लक्ष केंद्रीत करणार असल्याचं समजतंय.
विशाखापट्टणमध्ये नुकतंच पुष्पा 2 चं शूटिंग पार पडलं. याठिकाणी चित्रपटातील एका गाण्याची शूटिंग करण्यात आली. गेल्या वर्षी नोव्हेंबरपासून या चित्रपटाच्या कामाला सुरुवात झाली. सर्वांत आधी अल्लू अर्जुनचा लूक टेस्ट करण्यात आला. सिनेमॅटोग्राफर मिरास्लो कुबा ब्रोझेक याने इन्स्टाग्रामवर अल्लू अर्जुनच्या लूक टेस्टचा फोटो पोस्ट केला होता. निर्मात्यांना डिसेंबर 2022 मध्ये हा सीक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला आणायचा होता. त्यामुळे त्याची शूटिंग खूप आधीच सुरू होणार होती. मात्र काही कारणास्तव शूटिंगचं शेड्युल पुढे ढकललं गेलं.
पुष्पा 2 मध्ये अल्लू अर्जुन आणि फहाद फासिल यांच्यातील टक्कर पहायला मिळणार आहे. पहिल्या भागाच्या अखेरीस फहाद फासिल हा मुख्य खलनायक दाखवण्यात आला होता. यामध्ये रश्मिका मंदाना (श्रीवल्ली), सुनील आणि अनसुया भारद्वाज यांच्याही भूमिका आहेत.
ऑगस्टरमध्ये पूजा झाल्यानंतर पुष्पा 2 च्या प्रोजेक्टची सुरुवात झाली होती. दुसऱ्या भागाचं दिग्दर्शनसुद्धा सुकुमारच करणार आहे. मूळ तेलुगू भाषेत हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्यानंतर हिंदी, तमिळ, मल्याळम आणि कन्नड भाषेत त्याचं डबिंग करण्यात आलं होतं. पाच विविध भाषांमध्ये प्रदर्शित होणारा हा अल्लू अर्जुनचा पहिलाच चित्रपट होता.