मुंबई : दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतला सुपरस्टार अल्लू अर्जुन (Superstar Allu Arjun) आणि समंथाचं (samntha) ‘ओ अंटवा’ हे गाणं सोशल मीडियावर (social media) धुमाकूळ घालत आहे. ‘पुष्पा: द राइज’ या चित्रपटात अभिनयाची राणी रश्मिका मंदानाने देखील दमदार भूमिका साकारली आहे. सरत्या वर्षाच्या शेवटी प्रदर्शित झालेला हा चित्रपट हिंदीतही डब झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून घेतलं. समीक्षकांचं तर प्रचंड प्रेम मिळालं. अभिनयापासून ते गाणी आणि डायलॉग प्रेक्षकांच्या ओठावर आहेत.समंथा रुथ प्रभूने पहिल्यांदाच एक आयटम साँग केलं आहे. ज्या गाण्याचं नाव आहे ‘ओ अंटवा’. या गाण्याचं नृत्यदिग्दर्शन बॉलिवूडचे प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्य यांनी केलं आहे. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत गणेश आचार्य यांनी अल्लू आणि समंथासोबत या गाण्याच्या रिहर्सलबद्दल वेगवेगळे किस्से सांगितले. त्यातला अतिशय महत्त्वाचा प्रसंग त्यांनी अधोरेकित केला. गणेश आचार्य यांच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया होणार होती. पण या गाण्यामुळे त्यांनी होणारी शस्त्रक्रिया पुढे ढकलली आणि गाणं पूर्ण केलं. आज त्याच गाण्यावर सगळा भारत नाचतोय.
“चित्रपट 17 डिसेंबरला रिलीज होणार होता. मला 2-3 तारखेला अल्लूचा फोन आला आणि त्याने सांगितले की मास्टरजी आपण एक गाणं करतोय. पण मी माझी अडचण त्याला त्यावेळी फोनवर सांगितली. तसंच हा खूप कमी वेळ आहे. दोन दिवसांत माझ्या डोळ्याचं ऑपरेशन आहे, असल्याचंही अल्लूला सांगितलं. पण त्यानंतर चित्रपटाच्या निर्मात्यांनी माझ्या डॉक्टरसोबत फोनवरुन संवाद साधला. डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर ऑपरेशनची तारीख पुढे ढकलली. मग गाणं शूट केलं. अल्लू आणि समांथाने दोन दिवसांत गाण्याची रिहर्सल केली. समांथासोबत मी पहिल्यांदाच गाणं कोरिओग्राफ केलं, अशा आठवणी गणेश आचार्य यांनी ई टाईम्सशी बोलताना सांगितल्या.
दरम्यानच्या काळात समांथा खूप नाराज होती. कारण चित्रपटाच्या अगदी शेवटी गाण्याचं प्लॅनिंग केलं होतं. तिला हे पण माहिती नव्हतं की मी हे गीत कोरिओग्राफ करतो आहे. हे गाणं दुसरं कुणीतरी कोरिओग्राफ करणार होतं. पण अल्लूने मला फोन केला. आमचं बोलणं झालं. त्यानुसार मग काही स्पेशल मूममेंट गाण्यादरम्यान केल्या. त्याच मुमेंट आज प्रेक्षकांच्या हृदयात घर करुन राहिल्या आहेत, असं गणेश आचार्य यांनी सांगितलं.
अल्लू आणि समांथाने गाण्यादरम्यान आपला खास अॅटीटूड दाखवला आहे, जो या गाण्यात गरजेचा होता. सुंदर आणि कमालीचं गाणं झाल्याचं नंतर मला अनेकांनी फोन करुन सांगितलं. गाण्याच्या कोरिओग्राफीचा अनुभव कमाल होता, अशा भावना गणेश आचार्य यांनी सरतेशेवटी बोलून दाखवल्या.