मुंबई : अभिनेता आर माधवनचा मुलगा वेदांत माधवनने पुन्हा एकदा सुवर्णकामगिरी करत देशाची मान उंचावली आहे. वेदांत अभिनयविश्वापासून दूर जलतरण स्पर्धांमध्ये आपलं नशीब आजमावतोय. आपल्या दमदार कामगिरीने तो जगभरात नाव कमावतोय. नुकताच त्याने एका जलतरण स्पर्धेत मोठा विजय मिळविला आहे. या विजयाचा आनंद खुद्द आर. माधवनने सोशल मीडियावर व्यक्त केला आहे. वेदांतने एक किंवा दोन नव्हे तर तब्बल पाच सुवर्णपदकं जिंकली आहेत. शनिवारी आणि रविवारी पार पडलेल्या मलेशियन इन्वटेशनल एज ग्रुप चॅम्पियनशिपमध्ये त्याने ही सुवर्णकामगिरी केली आहे.
देवाच्या कृपेने आणि तुम्हा सर्वांच्या शुभेच्छांनी वेदांतने क्वालालंपूर इथं या शनिवार आणि रविवार आयोजित केलेल्या मलेशियन इन्विटेशनल एज ग्रुप चॅम्पियनशिप 2023 मध्ये भारतासाठी पाच सुवर्णपदकं (50 मीटर, 100 मीटर, 200 मीटर, 400 मीटर आणि 1500 मीटर) पटकावले आहेत. त्यात दोन ‘पीबी’चाही (पर्सनल बेस्ट) समावेश आहे. मी खूप आनंदी आणि कृतज्ञ आहे, अशी पोस्ट आर. माधवनने लिहिली आहे. यासोबतच त्याने मुलाचे फोटो पोस्ट केले आहेत. यातील एका फोटोमध्ये माधवनच्या पत्नीच्या चेहऱ्यावरील आनंद सहज पहायला मिळतोय. माधवनच्या या पोस्टवर सर्वसामान्यांसह इंडस्ट्रीतील सेलिब्रिटींकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
याआधी वेदांतने अशाच प्रकारची सुवर्णकामगिरी केली होती. ‘खेलो इंडिया युथ गेम्स 2022’मध्ये त्याने महाराष्ट्रासाठी तीन सुवर्णपदकं आणि दोन रौप्य पदकं जिंकली होती. एका मुलाखतीत वेदांतने त्याच्या या करिअरसाठी आईवडिलांनी केलेल्या त्यागाचा उल्लेख केला होता. “मला माझ्या बाबांच्या सावलीखाली जगायचं नव्हतं. मला माझं स्वत:चं नाव कमवायचं होतं. फक्त आर. माधवनचा मुलगा म्हणून मला राहायचं नाहीये. त्यांनी माझी नेहमीच काळजी घेतली आहे. आई आणि बाबा दोघंही माझ्यासाठी खूप काही करतात. माझ्या आईवडिलांनी माझ्यासाठी केलेला सर्वांत मोठा त्याग म्हणजे ते मुंबई सोडून दुबईला राहायला आले”, असं तो म्हणाला होता.
गेल्या वर्षी आर. माधवन त्याच्या कुटुंबीयांसह दुबईला राहायला गेला. वेदांतला चांगलं प्रशिक्षण मिळावं यासाठी त्यांनी हा मोठा निर्णय घेतला. “कोविडमुळे मुंबईतील काही स्विमिंग पूल बंद आहेत तर काही खूपच लांब आहेत. प्रशिक्षणासाठी पुरेशा सुविधा उपलब्ध नसल्यामुळे वेदांतच्या 2026च्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठीच्या तयारीला अडथळा येऊ नये म्हणून कुटुंबाने हे पाऊल उचललंय. दुबईत त्याला मोठ्या स्विमिंग पूलसाठी प्रवेश मिळाला आहे. सरिता आणि मी त्याच्या पाठिशी आहोत. तो ऑलिम्पिकसाठी तयारी करतोय”, असं माधवनने सांगितलं होतं.