नवी दिल्ली : बॉलिवूडची पंजाबी गर्ल परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि आप खासदार राघव चढ्ढासोबत (Raghav Chadha) या दोघांचा साखरपुडा 13 मे रोजी होणार आहे. परिणीती आणि राघवच्या एंगेजमेंटची तयारी मुंबई ते दिल्ली सुरू आहे. दोघांची एंगेजमेंट पंजाबी रितीरिवाजांनुसार होणार आहे. परिणिती आणि राघवचे कुटुंबातील सदस्य आणि खास मित्र या एंगेजमेंटला उपस्थित राहणार आहेत. परिणीतीने एंगेजमेंटसाठी खास थीमही ठेवली आहे. परिणीतीची बहीण आणि अभिनेत्री प्रियांका चोप्रासुद्धा (Priyanka Chopra) या सोहळ्यात सहभागी होणार असून उद्या सकाळी ती दिल्लीत येणार असल्याचे समजते.
एगेंजमेंटच्या तयारीसाठी परिणीती काही दिवस आधीच दिल्लीत पोहोचली होती. ड्रेसपासून डेकोरेशनपर्यंत सर्व काही खास थीमनुसार तयार केले जात आहे. परिणिती-राघव दोघेही पंजाबी कुटुंबातील असल्यामुळे एंगेजमेंटचा कार्यक्रम पंजाबी पद्धतीने होणार आहे. एगेंजमेंटपूर्वी दुपारी 12 ते 1 च्या सुमारास पठण होणार आहे. अरदास नंतर भोजनाचा कार्यक्रम होईल.
संध्याकाळी रिंग सेरेमनी पार्टी होईल. जिथे परिणीती -राघव एकमेकांना अंगठी घालतील. अतिशय साधेपणाने आणि सोप्या पद्धतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. राघव-परिणितीच्या लग्नाला सुमारे 13 ते 150 लोक उपस्थित राहणार आहेत. ज्यामध्ये कुटुंबातील सदस्य, परिणीतीची बहीण अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा यांचा समावेश असेल.
परिणीतीने पेस्टल कलर्सवर आधारित एंगेजमेंटची थीम ठेवली आहे. परिणीती स्वतः एक अतिशय साधा आणि सुंदर लूक कॅरी करेल. अभिनेत्रीने यासाठी प्रसिद्ध डिझायनर मनीष मल्होत्राचा भारतीय पोशाख निवडला आहे. तर राघव चढ्ढा विशेष पेहरावात दिसणार आहे. राघवने लग्नासाठी त्याचे मामा आणि फॅशन डिझायनर पवन सचदेवा यांचा पोशाख निवडला आहे.
राघव आणि परिणीतीची एंगेजमेंट हा एक वैयक्तिक कार्यक्रम असेल, ज्यामध्ये बॉलिवूड आणि राजकारणाशी संबंधित सेलिब्रिटी सामील होतील. दोघांच्या लग्नाची तारीख अद्याप समोर आली नसली तरी परिणीती आणि राघव ऑक्टोबरमध्ये लग्न करू शकतात अशी चर्चा आहे.