लाहोर : 1 फेब्रुवारी 2024 | पाकिस्तानी सुफी गायक राहत फतेह अली खान काही दिवसांपूर्वी एका वादग्रस्त व्हिडीओमुळे चर्चेत आले होते. या व्हिडीओमध्ये ते त्यांचे शिष्य नावीद हसनैनला चपलाने मारताना दिसले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. त्यानंतर त्यांनी जाहीर माफीदेखील मागितली होती. बाटली हरवल्याने ते त्यांच्या शिष्यावर भडकले होते आणि रागाच्या भरात त्याला चपलेनं मारत होते. आता एका युट्यूबरला दिलेल्या मुलाखतीत राहत यांनी त्या घटनेवर मोकळेपणे भाष्य केलं आहे.
युट्यूबर अदील असिफच्या पॉडकास्टमध्ये राहत म्हणाले, “मी लगेच त्याची माफी मागितली होती. मी माफी मागितल्यानंतर तो रडू लागला आणि मला म्हणाला, उस्तादजी तुम्ही का माफी मागत आहात? याआधी मी नावीदला अनेकदा आर्थिक मदतसुद्धा केली होती. त्याच्या वडिलांच्या उपचारासाठी, बहिणीच्या ऑपरेशनसाठी मीच पैसे दिले होते. त्याच्या घरातील लग्नकार्यातही मी आर्थिक मदत केली होती. मी अनेकदा त्याच्या मदतीला धावून गेलो.”
राहत फतेह अली खान हे दारुच्या बाटलीसाठी शिष्याला मारत होते, अशी चर्चा होती. मात्र ती बाटली मद्याची नव्हे तर ‘पवित्र पाण्याची’ होती असं त्यांनी स्पष्ट केलं. “हे खरंय की त्या बाटलीत पवित्र पाणी होतं. लोकांना त्यामागे माझी भावना समजत नाहीये. माझ्यासाठी ती अध्यात्मिक गोष्ट आहे. माझ्यासाठी ती खूप मोठी गोष्ट आहे”, असं ते पुढे म्हणाले. यावेळी त्यांनी त्यांच्या लहानपणाचीही गोष्ट सांगितली. वडील फारुख फतेह अली खान हे मला खूप मारायचे असं त्यांनी सांगितलं.
Trigger warning ⚠️
Video of Rahat fateh ali khan comes out where he is beating his househelp for a mere bottle while they are seen begging for help!
Clearly, he is drunk! He has completely lost it. 🤬🤬 pic.twitter.com/SIH8nmkakM
— Dia AZ (@drdia_a) January 27, 2024
“माझे वडील मला खूप मारायचे. ते जणू हिटलरसारखेच होते. त्यांना कधीही माझ्या कोणत्याही चुकीविषयी समजलं, तर ते मला दगडाने मारायचे. जर कोणीच माझा बचाव केला नाही, तर मला मोठ्या दगडाने मार बसायचा. माझे गुरु नुसरत फतेह अली खानसुद्धा खूप कठोर होते. त्यांची एक नजरच पुरेशी होती. संगीत क्षेत्रात मी त्यांच्यापेक्षा कठोर गुरु कुठेच पाहिलं नाही”, असं ते म्हणाले.
शिष्याला मारतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राहत यांनी लगेच स्पष्टीकरणाचा व्हिडीओ पोस्ट केला होता. आपली बाजू मांडत राहत म्हणाले होते, “ही उस्ताद आणि शागिर्द (गुरू-शिष्य) यांच्यातील गोष्ट आहे. जेव्हा तो चांगला काम करतो, तेव्हा आम्ही त्याचं कौतुक करतो आणि जेव्हा तो चूक करतो, तेव्हा आम्ही त्याला शिक्षासुद्धा देतो.”