अभिनेता सलमान खानच्या वांद्रे इथल्या निवासस्थानाबाहेर रविवारी पहाटे गोळीबार झाला. यात कोणीही जखमी झाले नसले तरी त्यामुळे सलमानच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. रविवारी पहाटे पाच वाजताच्या सुमारास बाईकवरून आलेल्या दोघांनी सलमानच्या घराच्या दिशेने पाच गोळ्या झाडल्या. याप्रकरणी वांद्रे पोलीस तसंच स्थानिक पोलीस गुन्हे शाखा समांतर तपास करत आहेत. गुंड लॉरेन्स बिश्नोईचा धाकटा भाऊ अनमोल याने फेसबुक पोस्टद्वारे या गोळीबाराची जबाबदारी स्वीकारली आहे. या घटनेनंतर अनेकांनी सलमानविषयी काळजी व्यक्त केली आहे. पहाटे गोळीबाराच्या घटनेनंतर दुपारनंतर बहीण अर्पिता खान, भाऊ अरबाज खान, पुतणा अरहान खान हे सर्वजण गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये सलमानच्या भेटीसाठी आले होते. निर्माते-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनीसुद्धा सलमानची भेट घेतली. इतकंच नव्हे तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेसुद्धा सलमानच्या भेटीला पोहोचले होते.
गोळीबाराची घटना घडली तेव्हा सलमान घरीच होता. गोळीबार झाला त्यापूर्वी दोन तास म्हणजे तीनच्या सुमारास सलमान घरी आला होता. सलमानच्या घराबाहेर सुरक्षेसाठी पोलिसांसह पोलिसांची एक गाडी असते. पण गोळीबार झाला तेव्हा ती गाडी तिथे होती की नव्हती हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. सलमानच्या घराबाहेरील रस्त्यावर सीसीटीव्हीच्या तपासणीत गोळीबार करणारे दोघे दोन दिवसांपूर्वीही तिथे दिसून आले होते, अशी माहिती सूत्रांनी दिली. गोळीबारानंतर दोघांनीही माऊंट मेरी परिसरात दुचाकी सोडली. तिथून त्यांनी रिक्षा पकडून वांद्र्याच्या दिशेने मुंबईबाहेर गेल्याचा संशय आहे.
सलमान खान राहत असलेल्या गॅलेक्सी अपार्टमेंटच्या बाहेर दोन दुचाकीवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी पहाटे पाच वाजता गोळ्या झाडल्या. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या धमक्यांनंतर मुंबई पोलिसांनी सप्टेंबर 2023 मध्ये सलमानला पुरविण्यात येत असलेल्या सुरक्षेचा आढावा घेत त्याला सतर्क राहण्यास सांगितलं होतं. सध्या सलमानला वाय प्लस श्रेणीची सुरक्षा पुरवण्यात येते.
गोळीबाराच्या या घटनेच्या तपासाकडे दिल्ली पोलीस आणि केंद्रीय यंत्रणांचंही लक्ष आहे. गुंड लॉरेन्स बिश्नोईचा धाकटा भाऊ अनमोल या गोळीबाराची जबाबदारी स्वीकारल्याने तिहार तुरुंगात असलेल्या लॉरेन्स बिश्नोईची चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. गोळीबार करण्यासाठी आलेला एक आरोपी विशाल ऊर्फ काळू हा बिश्नोई गँगशी सबंधित असल्याची माहिती आहे. शूटर विशाल हा बिश्नोई गँगच्या रोहित गोदारासाठी काम करत असल्याचं समोर आलंय. विशाल ऊर्फ काळू याचा हरयाणामधील एका व्यवसायिकाच्या हत्येत सहभाग होता. मागच्याच महिन्यात त्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.