‘मराठी चित्रपटांमध्ये स्क्रिनप्ले नावाची गोष्टच नसते, घाईगडबडीत केल्यासारखे वाटतात’, राज ठाकरे यांचं रोखठोक मत

| Updated on: Nov 21, 2022 | 9:59 PM

मराठी चित्रपटांमध्ये नेमक्या काय ऋटी असतात यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाष्य केलंय.

मराठी चित्रपटांमध्ये स्क्रिनप्ले नावाची गोष्टच नसते, घाईगडबडीत केल्यासारखे वाटतात, राज ठाकरे यांचं रोखठोक मत
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : मराठी चित्रपटांमध्ये नेमक्या काय ऋटी असतात यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाष्य केलंय. राज ठाकरे यांनी आज ‘अथांग’ वेबसीरिजच्या ट्रेलरच्या लॉन्चिंगच्या कार्यक्रमात हजेरी लावली. प्रेक्षकांसाठी ‘अथांग’ वेबसीरिज येत्या शुक्रवारपासून ‘प्लॅनेट मराठी’वर उपलब्ध होणार आहे. याच वेबसीरिजच्या ट्रेलर लॉन्चिंगच्या कार्यक्रमात राज ठाकरे सहभागी झाले. यावेळी अभिनेत्री तेजस्विनी पंडित हीने राज ठाकरे यांची मुलाखत घेतली. यावेळी राज ठाकरे यांना मराठी चित्रपटांमध्ये कोणत्या गोष्टींच्या ऋटी वाटतात? असा प्रश्न विचारण्यात आल्या. त्यावर त्यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली.

“माझ्या घरात ड्रोबो नावाचं मशीन आहे. त्या मशीनमध्ये साडेआठ ते पावणे नऊ हजार चित्रपट आहेत. त्या सर्व फिल्म्स मी पाहिलेल्या आहेत. मी राजकारणात खूप अपघाताने आलोय. माझं पहिलं फॅशन हे फिल्म मेकींग आहे. त्यामुळे मी चित्रपट त्या दृष्टीकोनाने पाहतो”, असं राज ठाकरेंनी सांगितलं.

“मला बरेचसे मराठी चित्रपट पाहत असताना खूप घाईगडबडीत केल्यासारखे वाटतात. आपल्याला पटकन चित्रपट करायचा आहे, या विचारामुळे बऱ्याचदा स्क्रिनप्ले नावाची गोष्टच नसते. बऱ्याच काही प्रमाणात ऋटी असतात. पण हे सरसकट सर्व चित्रपटांना म्हणता येणार नाही”, असं राज ठाकरेंनी स्पष्ट केलं.

“असे अनेक चित्रपट आहेत ज्यामध्ये कास्टिंग, अभिनय उत्तम, बांधनी उत्तम आहे, असे अनेक चित्रपट आपल्याकडे आले”, असंदेखील ते यावेळी म्हणाले.

“ज्याप्रकारे नवे मुलं-मुली येत आहेत त्यांच्याकडून नव्या गोष्टी पाहायला मिळतील, जेणेकरुन मराठीचा तो काळ पुन्हा एकदा यावा, अशी अपेक्षा आहे. अमराठी लोकं येऊन मराठी नाटकांना बसायची आणि हिंदी चित्रपट काढायची. तो काळ पुन्हा यावा”, अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली.