‘हे औदार्य महागात पडेल..’; पाकिस्तानी चित्रपटाच्या प्रदर्शनावरून राज ठाकरेंना थेट इशारा

| Updated on: Sep 22, 2024 | 11:27 AM

पाकिस्तानी कलाकार फवाद खान आणि माहिरा खान यांच्या 'द लेजंड ऑफ मौला जट्ट' या चित्रपटाच्या प्रदर्शनाला भारतात विरोध होत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या चित्रपटाबाबत पोस्ट लिहिली आहे. या पोस्टद्वारे त्यांनी थेट सरकारला इशारा दिला आहे.

हे औदार्य महागात पडेल..; पाकिस्तानी चित्रपटाच्या प्रदर्शनावरून राज ठाकरेंना थेट इशारा
राज ठाकरे लवकरच अमरावती दौऱ्यावर जाणार आहेत.
Follow us on

पाकिस्तानी अभिनेता फवाद खान आणि माहिरा खान यांचा बहुचर्चित पाकिस्तानी चित्रपट ‘द लेजंड ऑफ मौला जट्ट’ हा चित्रपट येत्या 2 ऑक्टोबर रोजी भारतात प्रदर्शित होणार आहे. मात्र प्रदर्शनापूर्वीच हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं या चित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोध केला आहे. याप्रकरणी आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक्स (ट्विट) अकाऊंटवर पोस्ट लिहिली आहे. ‘हा सिनेमा जेव्हा प्रदर्शित होणार आहे, त्याच्या आसपास नवरात्रौत्सव सुरु होणार आहे. अशावेळेस कुठलाही संघर्ष महाराष्ट्रात व्हावा अशी माझी इच्छा नाही आणि तशीच ती इच्छा राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि राज्याच्या पोलीस महासंचालकांची पण नसणार आणि उगाच संघर्ष आम्हाला पण नको आहे,’ अशा थेट इशारा राज ठाकरेंनी दिला आहे.

राज ठाकरेंचं ट्विट-

‘फवाद खान नावाच्या पाकिस्तानी अभिनेत्याचा, ‘लिजेंड ऑफ मौला जट’ नावाचा सिनेमा लवकरच भारतात प्रदर्शित होणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा सिनेमा कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही. पाकिस्तानी कलाकारांचे सिनेमे मुळात भारतात प्रदर्शित का होऊ दिले जातात? आणि कलेला देशांच्या सीमा नसतात, हे सगळं इतर बाबतीत ठीक आहे, पण पाकिस्तानच्या बाबतीत हे अजिबात चालू देणार नाही. हिंदुस्थानचा द्वेष या एकमेव मुद्द्यावर जो देश तगला आहे, अशा देशातील कलाकारांना इथे आणून नाचवणं, त्यांचे सिनेमे प्रदर्शित करून देणं हा काय प्रकार सुरु आहे? महाराष्ट्र सोडाच पण देशातील कुठल्याच राज्यात हा सिनेमा तिथल्या तिथल्या सरकारांनी प्रदर्शित होऊ नाही दिला पाहिजे,’ असं राज ठाकरेंनी म्हटलंय.

हे सुद्धा वाचा

‘अर्थात बाकीच्या राज्यांनी काय करायचं हा त्यांचा प्रश्न आहे. महाराष्ट्रात हा सिनेमा रिलीज होऊ दिला जाणार नाही, हे नक्की. या आधी असे प्रसंग जेव्हा आले होते तेव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिलेला दणका सगळ्यांना आठवत असेल. त्यामुळे थिएटर मालकांना सध्या तरी नम्रपणे आवाहन आहे की उगाच सिनेमा प्रदर्शित करण्याच्या भानगडीत पडू नका. हा सिनेमा जेव्हा प्रदर्शित होणार आहे, त्याच्या आसपास नवरात्रौत्सव सुरु होणार आहे. अशावेळेस कुठलाही संघर्ष महाराष्ट्रात व्हावा अशी माझी इच्छा नाही आणि तशीच ती इच्छा राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि राज्याच्या पोलीस महासंचालकांची पण नसणार आणि उगाच संघर्ष आम्हाला पण नको आहे,’ अशा इशारा ठाकरेंनी दिला आहे.

‘त्यामुळे वेळीच पाऊलं उचलून हा सिनेमा आपल्याकडे प्रदर्शित होणार नाही हे पहावं. मराठी सिनेमांना थिएटर्स उपलब्ध करून देताना मागेपुढे करणाऱ्या थिएटर मालकांनी जर पाकिस्तानी सिनेमाला या भूमीत पायघड्या घातल्या, तर हे औदार्य महागात पडेल हे विसरू नये. कुठल्यातरी पाकिस्तानी सिनेमासाठी राज्यात संघर्ष होऊ नये अशीच माझी इच्छा आहे आणि सरकार त्याकडे योग्य ते लक्ष देईल याची मला खात्री आहे,’ असं त्यांनी या पोस्टच्या अखेरीस म्हटलंय.

2016 मध्ये झालेल्या उरीतील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतात पाकिस्तानी चित्रपटांवर आणि पाकिस्तानी कलाकारांवर बंदी आणण्यात आली होती. फवाद आणि माहिरा खान यांनी याआधी बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केलंय. माहिराने शाहरुख खानच्या ‘रईस’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. तर फवादने ‘ए दिल है मुश्कील’ आणि ‘खुबसूरत’ यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या होत्या.