मुंबई | 6 सप्टेंबर 2023 : ऊपर आका और नीचे काका… दिवंगत अभिनेते राजेश खन्ना यांच्यासाठी ही ओळ फार प्रसिद्ध होती. राजेश खन्ना यांना लोक प्रेमाने ‘काका’ म्हणायचे. त्यांनी एकानंतर एक सोळा सुपरहिट चित्रपट दिले होते. यामुळे त्यांना सुपरस्टारचा किताब मिळाला होता. राजेश खन्ना यांनी त्यांच्या करिअरमध्ये असंख्य हिट चित्रपटांमध्ये काम केलं होतं. मात्र त्यांचं स्टारडम काही वर्षांनंतर फिकं पडलं. कारण इंडस्ट्रीत राजेश खन्ना यांची जागा अमिताभ बच्चन यांनी घेतली होती. राजेश खन्ना जिथे रोमांटिक हिरो म्हणून ओळखले जात होते, तिथेच अमिताभ बच्चन हे अँग्री यंग मॅन बनून दमदार भूमिका साकारत होते.
असं म्हटलं जातं की राजेश खन्ना यांच्या आयुष्यात एक असा टप्पा आला होता, जेव्हा त्यांना काम मिळणं बंद झालं होतं. एकेकाळी निर्माते आणि दिग्दर्शक त्यांच्या घराबाहेर रांग लावून उभे असायचे. मात्र अचानक त्यांचा स्टारडम फिका पडला. तर दुसरीकडे लग्नाच्या काही वर्षांनंतर त्यांची पत्नी आणि अभिनेत्री डिंपल कपाडिया ही राजेश खन्ना यांना सोडून आपल्या दोन मुलींसोबत वेगळी राहू लागली. या दोघांनी एकमेकांना घटस्फोट दिला नव्हता, मात्र ते सोबत राहत नव्हते.
राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया यांनी 1973 मध्ये लग्नगाठ बांधली होती. तर 1984 पासून दोघं वेगळे राहत होते. त्यांनी अधिकृतरित्या घटस्फोट घेतला नव्हता. दुसरीकडे राजेश खन्ना हे अनिता अडवाणीसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याचीही चर्चा होती. डिंपल कपाडिया ही राजेश खन्ना यांच्यापासून वेगळी राहत असली तरी जेव्हा त्यांना कॅन्सर झाल्याचं तिला समजलं, तेव्हा ती त्यांच्याकडे निघून गेली. त्या काळात डिंपलने राजेश खन्ना यांची खूप काळजी घेतली. तरीसुद्धा राजेश खन्ना यांनी त्यांच्या मृत्यूपत्रात पत्नी डिंपलसाठी एकही पैसा दिला नाही.
राजेश खन्ना यांनी त्यांची संपूर्ण संपत्ती ट्विंकल आणि रिंकी या दोन मुलींच्या नावे केली. यामध्ये आशीर्वाद हा बंगला, बँक अकाऊंट्स आणि इतर संपत्तीचा समावेश होता. 2012 मध्ये त्यांची कॅन्सरशी झुंज अपयशी ठरली. 18 जुलै 2012 रोजी राजेश खन्ना यांचं निधन झालं.