कर्नाटक- दिवंगत कन्नड अभिनेते पुनीत राजकुमार यांना मरणोत्तर कर्नाटक रत्न हा कर्नाटकचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्कार सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेते रजनीकांतसुद्धा उपस्थित होते. 67 व्या कन्नड राज्योत्सवानिमित्त त्यांचा सन्मान करण्यात आला होता. या कार्यक्रमात रजनीकांत आणि ज्युनियर एनटीआर हे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यासह प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी मंचावर पुनीत राजकुमार यांच्याविषयी बोलताना रजनीकांत भावूक झाले. पुनीत यांच्या अंत्यविधीला उपस्थित का राहता आलं नाही, याचं कारणही त्यांनी यावेळी सांगितलं.
रजनीकांत यांनी पुनीत यांचा उल्लेख ‘देवाचं मूल’ असा केला. म्हणाले, “कलियुगात अप्पू (पुनीत) हा मार्कंडेय, प्रल्हाद आणि नचिकेतसारखा आहे. तो देवाचा पुत्र होता. काही काळ तो आपल्यात राहिला, आपल्याबरोबर खेळला, सर्वांना हसवलं आणि नंतर ते मूल देवाकडे परत गेलं. त्याच्या आत्मा आपल्यासोबत आहे.”
पुनीत यांच्या कुटुंबीयांशी जवळचं नातं असूनही त्यांच्या अंत्यसंस्काराला का उपस्थित राहू शकले नाही, याचं कारण रजनीकांत यांनी पुढे सांगितलं. भावूक झालेल्या रजनीकांत यांनी सांगितलं की त्याच वेळी त्यांची तब्येत बिघडली होती. त्यामुळे त्यांच्या तब्येतीचा विचार करून तीन दिवसांनंतर त्यांना पुनीत यांच्या निधनाची माहिती देण्यात आली होती. “माझ्यावर शस्त्रक्रिया झाली होती आणि मी आयसीयूमध्ये दाखल होतो. जरी मला त्यावेळी पुनीतच्या निधनाबद्दल समजलं असतं तरी प्रकृतीमुळे मी त्याच्या अंत्यविधीला उपस्थित राहू शकलो नसतो. पण पुनीतचा हसरा चेहरा मी कधीच विसरू शकणार नाही”, अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या.
पुनीत यांचं वयाच्या 46 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. त्यांची पत्नी अश्विनी पुनीत राजकुमार यांनी हा पुरस्कार स्वीकारला. चांदीचं फलक आणि 50 ग्रॅम सुवर्णपदक असं या पुरस्काराचं स्वरुप होतं.
पुनीत यांनी 2002 मध्ये ‘अप्पू’ या चित्रपटातून अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं. अभी, वीरा कन्नडिगा, अरासू, राम, हुरूगारू आणि अंजनी पुत्र यांसारख्या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या आहेत. त्यांचा शेवटचा चित्रपट ‘गंधडी गुढी’ हा त्यांच्या पहिल्या पुण्यतिथीनिमित्त गेल्या आठवड्यात प्रदर्शित करण्यात आला.