साऊथ सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) यांना नियमितपणे कर भरल्याबद्दल चेन्नईच्या आयकर विभागाने (Tax Department) त्यांचा सन्मान केला आहे. रविवारी म्हणजेच 24 जुलै रोजी देशात आयकर दिन साजरा करण्यात आला. यादिवशी ‘थलायवा’ रजनीकांत यांना नियमित कर भरल्याबद्दल सन्मानित करण्यात आलं. तर बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारला (Akshay Kumar) मनोरंजन इंडस्ट्रीत सर्वाधिक कर भरल्याबद्दल ‘सन्मान पत्र’ देण्यात आलं. रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या रजनीकांत यांनी तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत. रजनीकांत काही कारणास्तव या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नव्हते. त्यांची मुलगी ऐश्वर्याने वडील रजनीकांत यांच्या अनुपस्थितीत तेलंगणाच्या राज्यपाल तमिलिसाई सुंदरराजन यांच्याकडून हा पुरस्कार स्वीकारला. ‘सर्वाधिक आणि नियमित करदात्याची अभिमानी मुलगी. आयकर दिन 2022 रोजी अप्पांचा सन्मान केल्याबद्दल तामिळनाडू आणि पुद्दुचेरीच्या आयकर विभागाचे खूप खूप आभार,’ अशी पोस्ट त्यांनी लिहिली.
ऐश्वर्या रजनीकांत यांनी ही पोस्ट शेअर करताच सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. 4 दशकांहून अधिक काळ फिल्मी दुनियेत सक्रिय असलेल्या रजनीकांत यांनी 1975 मध्ये अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. त्यावेळी त्यांना मिळणारं मानधन खूपच नाममात्र होतं, पण आज रजनीकांत हे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेणार्या सेलिब्रिटींमध्ये अग्रस्थानी आहेत.
2007 मध्ये ‘शिवाजी’ या चित्रपटाने यूके आणि दक्षिण आफ्रिकेत बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. त्यावेळी हा चित्रपट टॉप-10 सर्वोत्कृष्ट चित्रपटांमध्ये गणला जात होता. ‘शिवाजी’साठी रजनीकांत यांना 26 कोटी रुपये इतकं मानधन मिळालं. रजनीकांत यांच्या कारकिर्दीतील ही सर्वाधिक फी होती.
रजनीकांत यांना ‘रोबोट’ या चित्रपटासाठी 30 कोटी रुपये फी मिळाली होती. त्याच वेळी, 2019 च्या पेटा या चित्रपटासाठी त्यांना 65 कोटी रुपये मिळाले. रजनीकांत यांनी ‘रोबोट 2’ म्हणजेच ‘2.0’ या चित्रपटासाठी 65 कोटी रुपये फी घेतली होती. रजनीकांत यांना 2021 मध्ये आलेल्या ‘अन्नात्थे’ या चित्रपटासाठी 100 कोटी रुपये मानधन मिळाल्याचं सांगण्यात येत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला आणि दणक्यात कमाई केली होती.
अन्नाथे या चित्रपटानंतर रजनीकांत यांनी त्यांची फी वाढवल्याच्या बातम्या येऊ लागल्या. रजनीकांत आता नेल्सन दिलीपकुमार यांच्या ‘जेलर’मध्ये दिसणार आहेत. नुकतंच त्यांनी या चित्रपटाचं टेस्ट शूट केलं. तेलुगू 360 च्या रिपोर्टनुसार, रजनीकांत ‘जेलर’साठी त्यांनी 150 कोटी रुपये फी घेतली आहे. रजनीकांत हे सर्वात जास्त फी घेणारे पहिले भारतीय अभिनेते आहेत.