मुंबई | 26 ऑगस्ट 2023 : बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वांत जुन्या कुटुंबांपैकी एक म्हणजे कपूर कुटुंब. गेल्या चार पिढ्यांपासून इंडस्ट्रीत या कुटुंबाचा बोलबाला आहे. पृथ्वी राज कपूर ते राज कपूर, त्यानंतर ऋषी कपूर आणि आता रणबीर कपूर यांनी बॉलिवूड इंडस्ट्रीत आपलं नाणं खणखणीत वाजवलं. कपूर कुटुंबात इतरही काही कलाकार आहेत. ज्यामध्ये रणधीर कपूर आणि राजीव कपूर यांचा सहभाग आहे. मात्र राजीव आणि रणधीर यांना फिल्म इंडस्ट्रीत फारसं यश मिळालं नाही. यापैकी राजीव कपूर यांच्या करिअरमधील एका चित्रपटामुळे त्यांचं वडिलांशी नातं बिघडलं होतं.
राजीव कपूर यांचा जन्म 25 ऑगस्ट 1962 मध्ये झाला होता. तर 9 फेब्रुवारी 2021 मध्ये त्यांचं निधन झालं. ‘राम तेरी गंगा मैली’ या एका चित्रपटामुळे त्यांना आजही ओळखलं जातं. मात्र या चित्रपटामुळे त्यांना इंडस्ट्रीत खास यश मिळालं नाही. कारण सर्व लोकप्रियता अभिनेत्री मंदाकिनीने आपल्याकडे ओढून घेतली होती. राजीव कपूर यांचं त्यांच्या वडिलांशी म्हणजेच राज कपूर यांच्याशी विशेष जवळीक नव्हती. किंबहुना ‘राम तेरी गंगा मैली’ हा चित्रपट दोघांमधील दुराव्याचा महत्त्वाचा कारण ठरला होता.
राजीव कपूर यांचं फिल्मी करिअर त्यांच्या इतर भावंडांइतकं यशस्वी नव्हतं. मात्र नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे ते चर्चेत असायचे. त्यांनी 1985 मध्ये ‘राम तेरी गंगा मैली’ या चित्रपटातून पदार्पण केलं होतं. हा चित्रपट सुपरहिट ठरला होता, मात्र त्याचा फायदा राजीव कपूर यांना मिळाला नव्हता. राज कपूर यांनीच चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. या चित्रपटाला आजही राज कपूर यांचं दिग्दर्शन आणि मंदाकिनीचा अभिनय यांसाठीच ओळखलं जातं. या सर्वांत राजीव कपूर यांची भूमिका कुठेतरी लपून गेली. यासाठी ते वडिलांनाच दोषी मानत होते.
‘राम तेरी गंगा मैली’ या चित्रपटानंतर राजीव कपूर यांना वडिलांसोबत आणखी एक चित्रपट करायचा होता. मात्र यावेळी त्यांना त्यात मुख्य भूमिका साकारायची होती. मात्र राज कपूर यांनी तसं करण्यास विरोध केला. राज कपूर यांनी नेहमीच राजीव कपूर यांना सहाय्यक म्हणून कामावर ठेवलं होतं. ते चित्रपटाच्या युनिटचं सर्व काम पाहायचे. एक सहाय्यक आणि स्पॉटबॉट जितकं काम करतात, ते सर्व राजीव कपूर करायचे.
हळूहळू राज कपूर आणि राजीव कपूर यांच्यातील हा दुरावा इतका वाढला की वडिलांच्या निधनानंतरही मुलाने अंत्यसंस्काराला हजेरी लावली नव्हती. त्यांनी अखेरच्या क्षणी वडिलांचा चेहरासुद्धा पाहिला नव्हता. राजीव कपूर यांनी त्यांच्या करिअरमध्ये राम तेरी गंगा मैली या चित्रपटानंतर लव्हर बॉय, अंगारे, जलजला, शुक्रिया, हम तो चले परदेस यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं.