अभिनेता राजपाल यादवने सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत नेटकऱ्यांची माफी मागितली आहे. या व्हिडीओमध्ये राजपाल हात जोडून चाहत्यांची माफी मागताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी राजपालने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट करत लोकांना फटाके न फोडण्याची विनंती केली होती. फटाक्यांमुळे वायू आणि ध्वनी प्रदूषण होतो आणि प्राण्यांनाही त्रास होतो, म्हणून शांततेत दिवाळी साजरी करा, असं आवाहन त्याने केलं होतं. मात्र यावरून नेटकऱ्यांनी त्याला प्रचंड ट्रोल केलं होतं. राजपालचा जुना मांसाहारी बिर्याणी खातानाचा व्हिडीओ पुन्हा शेअर करत नेटकऱ्यांनी त्याच्यावर टीका केली होती. या टीकेनंतर अखेर राजपालने नेटकऱ्यांची माफी मागितली आहे. त्याचप्रमाणे फटाके फोडू नका अशी विनंती करणारा व्हिडीओसुद्धा त्याने डिलिट केला आहे.
एकीकडे मांसाहार करता आणि दुसरीकडे दिवाळीला फटाके फोडून प्राण्यांना त्रास देऊ नका, असं म्हणता.. अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या होत्या. राजपाल यादवला अनेकांनी ‘दुतोंडी भूमिका’ घेत असल्याचं म्हटलं होतं. या टीकेनंतर राजपालने दिवाळीच्या फटाक्यांसंबंधीचा व्हिडीओ डिलिट केला आहे.
‘मी मनापासून माफी मागतो. माझा हेतू दिवाळीच्या आनंदाला कमी करायचा नव्हता. दिवाळी हा आपल्या आनंदाचा आणि प्रकाशाचा सण आहे. दिवाळी सर्वांसाठी सुंदर बनवण्यातच आपला खरा सण आहे. तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि प्रेम. सर्वजण मिळून या दिवाळीला खास बनवुयात,’ असं कॅप्शन लिहित राजपालने माफीचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये राजपाल म्हणतोय, “सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आता दोन दिवसांपूर्वी मी माझ्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. तो व्हिडीओ मी लगेच काढून टाकला. या व्हिडीओमुळे देशातील आणि जगातील ज्या लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत, त्यांची मी मनापासून माफी मागतो. दिवाळीनिमित्त आनंद साजरा करा, स्वस्थ राहा आणि मस्त राहा.”
राजपाल यादव ‘भुल भुलैय्या 3’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. दिवाळीनिमित्त हा चित्रपट 1 नोव्हेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. यामध्ये राजपालने छोटा पंडितची भूमिका साकारली आहे. पहिल्या भागातील त्याची ही भूमिका प्रचंड गाजली होती.