अफलातून विनोदकौशल्याने प्रेक्षकांना खळखळून हसवणारे कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) यांनी आज (बुधवार) सकाळी अखेरचा श्वास घेतला. 10 ऑगस्ट रोजी त्यांना जिममध्ये व्यायाम करताना अचानक हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना दिल्लीतील एम्स (Delhi AIIMS) रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयात त्यांनी जवळपास 40 दिवस मृत्यूशी झुंज दिली. मात्र नियतीला काहीतरी वेगळंच अपेक्षित होतं.
राजू श्रीवास्तव यांच्या मृत्यूच्या कारणाबाबत डॉ. चिन्मय गुप्ता यांनी Tv9 भारतवर्षशी बोलताना सांगितलं, “राजूचा मृत्यू गॅस्ट्रोइंटेस्टायनल ट्रॅक्टमध्ये अंतर्गत रक्तस्रावामुळे झाला. पोट, लहान आतडे, मोठे आतडे आणि गुदाशय या संपूर्ण भागाला गॅस्ट्रोइंटेस्टायनल ट्रॅक्ट म्हणतात. या समस्येमुळे अनेकदा रक्तदाब नियंत्रणात राहत नाही आणि हृदयाचे ठोकेही वेगाने वाढू लागतात.”
राजू यांच्या मृत्यूचं प्राथमिक कारण हा हृदयविकाराचा झटका आहे, असं डॉक्टर गुप्ता यांनी स्पष्ट केलं. मात्र गॅस्ट्रोइंटेस्टायनल ट्रॅक्टमध्ये अंतर्गत रक्तस्त्राव झाल्यामुळे त्यांची प्रकृती गंभीर झाली होती, असं ते म्हणाले. यापूर्वी त्यांना तापही आला होता आणि त्यांच्या शरीराने औषधांना प्रतिसाद देणं हळूहळू सोडून दिलं होतं.
रुग्णालयात दाखल केल्यापासून राजू यांना शुद्धच आली नव्हती. ते सतत व्हेंटिलेटरवर होते. फक्त एक-दोनदा त्यांच्या शरीराची हलकी हालचाल झाली. मधल्या काळात त्यांच्या तब्येतीत थोडीफार सुधारणा झाली होती. पण गेल्या पाच दिवसांपासून त्यांना खूप ताप आणि शरीरात संसर्गही झाला होता. संसर्गामुळे कुटुंबातील एकाही सदस्याला त्यांची भेट घेण्याची परवानगी नव्हती.
राजू यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुलं आहेत. राजू यांच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यांची पत्नी शिखा त्यांच्या पाठीशी उभी राहिली. राजूच्या वाईट काळातही शिखाने त्यांची साथ दिली.