कॉमेडीचे किंग मानले जाणारे राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) यांचं बुधवारी सकाळी निधन झालं. त्यांच्या निधनाने मनोरंजनविश्वावर शोककळा पसरली आहे. राजू श्रीवास्तव यांच्या पार्थिवावर आज (गुरुवारी) अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. दिल्लीतील द्वारका इथून सकाळी 9 वाजता अंत्ययात्रा काढण्यात आली. राजू यांचा मुलगा आयुष्मानने त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. सर्वांना खळखळून हसवणारे राजू श्रीवास्तव पंचत्त्वात विलीन झाले आहेत. राजू श्रीवास्तव यांच्या अंत्यदर्शनासाठी त्यांचे जवळचे मित्र सुनील पाल (Sunil Pal) आणि एहसान कुरेशी (Ahsaan Qureshi) तिथं पोहोचले होते. राजू यांच्या पश्चात पत्नी शिखा, अंतरा आणि आयुष्मान ही दोन मुले आहेत. राजू यांचा मुलगा आयुष्मान सितार वादक आहे, तर मुलगी अंतरा सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करते.
राजू श्रीवास्तव यांचं पार्थिव त्यांच्या भावाच्या घरी सकाळपासून अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. तिथून त्यांचं पार्थिव 35 किमी अंतरावर असलेल्या निगम बोध घाटावर नेण्यात आलं. तिथं दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
राजू श्रीवास्तव यांना 10 ऑगस्ट रोजी जिममध्ये वर्कआऊट करताना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना ताबडतोबत दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथं डॉक्टरांनी त्यांना तातडीने व्हेंटिलेटरवर ठेवलं. त्यांची अँजिओप्लास्टीही करण्यात आली होती. डॉक्टरांनी त्यांना वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र 42 दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर बुधवारी सकाळी अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.
सुनील पाल आणि एहसान कुरेशी हे इंडस्ट्रीतील त्यांचे दोन जिवलग मित्र होते. ते सतत त्यांच्या तब्येतीचे अपडेट्स चाहत्यांपर्यंत पोहोचवत होते. सुनील पाल यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर राजू यांच्या तब्येतीबाबतचे अनेक व्हिडिओही शेअर केले होते. काही व्हिडिओमध्ये ते राजू यांच्याबद्दल बोलताना भावूक होताना दिसले.