कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Shrivastav) यांच्यावर अद्याप दिल्लीच्या एम्स (AIIMS) रुग्णालयात उपचार सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या प्रकृतीबद्दल सातत्याने अपडेट्स येत आहेत. राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीत थोडीफार सुधारणा झाली आहे. त्यांच्या प्रकृतीसाठी चाहते सातत्याने प्रार्थना करत आहेत. 10 ऑगस्ट रोजी हृदयविकाराच्या झटक्यानंतर (Heart Attack) त्यांना दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यांना व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आलं होतं आणि डॉक्टरांची एक टीम त्यांच्यावर उपचार करत आहे. ई टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, राजू श्रीवास्तव यांचा पुतण्या कुशल श्रीवास्तव याने त्यांच्या आरोग्याबद्दलची ताजी माहिती शेअर केली आहे. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सांगितलं की, राजू यांच्या हाताच्या बोटांची हालचाल सुरू आहे. याशिवाय त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या टीमकडूनही त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देण्यास सुरुवात केल्याची माहिती मिळाली आहे.
कुशल श्रीवास्तव यांनी त्यांच्या चाहत्यांना आवाहन केलं असून राजू यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करण्याची विनंती केली आहे. त्यांनी सांगितलं की डॉक्टरांची टीम त्यांच्यावर उपचार करत आहे आणि सर्वोत्तम उपचार देत आहे. आम्ही लोकांना खोट्या अफवा आणि नकारात्मक बातम्या पसरवण्यापासून रोखू इच्छितो. आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.
राजू श्रीवास्तव यांचं कुटुंब शनिवारी त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करण्यासाठी गुरुद्वारामध्ये पोहोचलं होतं. गुरुद्वारामध्ये त्यांनी राजू हे लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना केली. 10 ऑगस्ट रोजी दिल्लीतील एका जिममध्ये ट्रेडमिलवर वर्कआउट करत असताना राजू श्रीवास्तव यांना अचानक छातीत तीव्र वेदना जाणवू लागल्या आणि ते खाली पडले. त्यानंतर त्यांना दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आलं.