कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) यांना बुधवारी जिममध्ये वर्कआऊट करताना हृदयविकाराचा झटका (Heart Attack) आला. त्यानंतर त्यांना तातडीने दिल्लीतील एम्स (AIIMS) रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी त्यांची अँजिओप्लास्टी केली असून सध्या त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे. राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीची माहिती मिळाल्यानंतर त्यांचे चाहते त्यांच्यासाठी सतत प्रार्थना करत आहेत. व्हेंटिलेटरवर असलेल्या राजू यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं वृत्त आहे. बुधवारी (10 ऑगस्ट)दिल्लीतीलच एका जिममध्ये ट्रेडमिलवर धावत असताना अचानक त्यांच्या छातीत तीव्र वेदना होऊ लागल्या. या वेदनांमुळे ते बेशुद्ध होऊन जमिनीवर पडले. त्यानंतर त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आलं.
मिळालेल्या माहितीनुसार राजू श्रीवास्तव हे एम्सच्या कार्डियाक केअर युनिटमध्ये दाखल आहेत, जिथे डॉक्टरांची टीम त्यांच्यावर उपचार करत आहे. राजू यांची अँजिओग्राफी केली असता त्यांच्या हृदयात 100% ब्लॉकेज आढळले आहेत. राजू श्रीवास्तव यांचे भाऊ आशिष श्रीवास्तव म्हणाले, “राजू श्रीवास्तव यांना जिममध्ये जात असताना हृदयविकाराचा झटका आला. ते राज्यातील काही बड्या नेत्यांना भेटण्यासाठी दिल्लीत थांबले होते. ते सकाळी जिममध्ये गेले आणि त्याच दरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आलं आहे.”
राजू यांना लहानपणापासूनच विनोदाची आवड होती. त्यांना कॉमेडियन व्हायचं होतं. त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात ‘टी टाइम मनोरंजन’ या टीव्ही शोमधून केली होती. दूरदर्शनवर प्रसारित होणाऱ्या या शोमध्ये राजू, सुरेश मेनन आणि ब्रजेश हरजी यांसारख्या कलाकारांसोबत स्टेज शेअर करताना दिसले. मात्र, ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’मधून त्यांना खरी ओळख मिळाली. या शोमध्ये त्यांनी आपला यूपीचा अंदाज दाखवला आणि आपल्या पंच लाइनने लोकांना हसवलं.