कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) यांचं नाव ऐकताच चेहऱ्यावर आपोआप हसू येतं. स्टँडअप कॉमेडीच्या विश्वात राजू यांचं नाव अग्रस्थानी घेतलं जातं. गेल्या अनेक दिवसांपासून राजू हे एम्स (AIIMS) रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत होते. त्यांची ही झुंज आज अपयशी ठरली. बुधवारी सकाळी राजू यांनी अखेरचा श्वास घेतला. आज राजू आपल्यात नाहीत, मात्र त्यांनी साकारलेली अनेक पात्रं चाहत्यांना कायम लक्षात राहतील. राजू यांनी त्यांच्या शेवटच्या व्हिडिओमध्येही लोकांना हसवणं थांबवलं नाही.
राजू श्रीवास्तव यांनी त्यांचा शेवटचा व्हिडिओ इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला होता. जवळपास 6 आठवड्यांपूर्वी हा व्हिडीओ शेअर करण्यात आला होता. या व्हिडिओमध्ये राजू कोरोना कॉलर ट्युन अत्यंत मजेशीर पद्धतीने बोलून दाखवत आहेत. त्यांना हृदयविकाराचा झटका येण्याच्या एक दिवस आधी 9 ऑगस्ट रोजी हा व्हिडिओ शेअर करण्यात आला होता.
कोरोना महामारी आणि लॉकडाउनच्या काळात अमिताभ बच्चन यांच्या आवाजात कोरोनाची कॉलर ट्युन प्रकाशित करण्यात आली होती. हीच ट्युन राजू यांनी अत्यंत विनोदी स्वरूपात या व्हिडीओत मांडली. बिग बींच्या जागी शशी कपूर असते किंवा विनोद खन्ना असते, तर त्यांनी कशा पद्धतीने ती कॉलर ट्युन सादर केली असती, याची झलक त्यांनी या व्हिडीओत दाखवली.
राजू श्रीवास्तव यांच्या या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट करत त्यांना श्रद्धांजली वाहिली. 10 ऑगस्ट रोजी राजू यांना जिममध्ये वर्कआऊट करताना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना तातडीने दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.